Spread the love

साक्री रोडच्या राजाच्या आगमनासाठी धुळ्यात भक्तांची अलोट गर्दी

फटाक्यांची आतषबाजी अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शिवतीर्थ चौक दुमदुमला; १५ फुटांच्या आकर्षक गणरायाने वेधले लक्ष

धुळे | प्रतिनिधी

धुळ्यातील साक्री रोडच्या राजाच्या आगमन सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ चौकात भाविकांची मोठी गर्दी उसळली. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. सायंकाळच्या सुमारास शिवतीर्थ चौकातून उत्साहात गणरायाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली.

भाजपाचे नगरसेवक प्रदीप बैरागी यांच्या अध्यक्षतेखाली जय श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साक्री रोड भागातील जय श्रीकृष्ण मित्र मंडळाचा गणराया ‘साक्री रोडचा राजा’ म्हणून उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. यंदाही मंडळाने भगवान श्रीकृष्णाच्या रूपातील आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तब्बल १५ फुटांची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने शिवतीर्थ चौकात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. फटाक्यांच्या आतषबाजीने आणि गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीदरम्यान मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गणेशगीतांच्या तालावर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. भक्तिमय वातावरणात निघालेली ही आगमन मिरवणूक रात्री उशिरा साक्री रोड येथे पोहोचून संपन्न झाली.

यावेळी जय श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सदस्य तथा भाजपा नगरसेवक प्रदीप बैरागी, भरत बैरागी, संजय राठोड, राहुल चौधरी, हिमांशू परदेशी, रवींद्र पाटील, करण साळवे, विकी लोंढे, पुनीत पोपली, राज हाके, विशाल बागुल, राहुल नेरकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या भव्य आगमन सोहळ्यामुळे साक्री रोड परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version