नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गणरायाची उत्साहात स्थापना
बाल गणेश मंडळाची स्थापना; विद्यार्थ्यांच्या सहभागाने शाळेचा परिसर झाला भक्तिमय
नशिराबाद : येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात श्री गणेशाची स्थापना मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आकर्षक सजावट करून पर्यावरणपूरक आरास साकारली.
यावेळी विद्यार्थ्यांमधून बाल गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी चित्राक्षी चौधरी, उपाध्यक्षपदी ज्ञानिका पाटील, खजिनदारपदी करण महाजन, सचिवपदी गितेश चव्हाण, तर सहसचिवपदी स्वराज भावसार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सहसचिव स्वराज भावसार यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.
गणरायाच्या आगमनाने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर आनंदमय व भक्तिमय झाला. श्री गणेश स्थापना व आरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला नशिराबाद नगरीचे नगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव मधुकर चौबे, संचालक जनार्दन माळी, राजेश पाटील, ॲड. प्रदीप देशपांडे, माध्यमिक विभागाचे उपशिक्षक जितेंद्र महाजन, राजेंद्र पाचपांडे, मुख्याध्यापक प्रविण महाजन यांच्यासह माध्यमिक व प्राथमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या आकर्षक सजावटीचे कौतुक केले. तसेच शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणाऱ्या समर्थ वाणी याचे विशेष अभिनंदन केले. पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवाच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे नियोजन स्वाती अत्तरदे, दीपमाला सपकाळे, संगीता जोशी आणि जयश्री चौधरी यांनी केले असून त्यांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
