Spread the love

धुळ्यात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लाडक्या गणरायाची स्थापना!

ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट अन् पारंपरिक वेशभूषेत बाप्पाचे स्वागत; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

धुळे : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात धुळ्यात लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गणेश चतुर्थीनिमित्त शहरातील विविध भागांमध्ये गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या तालावर नाचणारे गणेशभक्त आणि पारंपरिक वेशभूषेत बाप्पाचे करण्यात आलेले स्वागत यामुळे संपूर्ण शहर गणेशमय झाले होते.

शहरातील संतोषी माता चौक, फुलवाला चौक, सिव्हिल हॉस्पिटल रोड, दत्त मंदिर चौक यांसह विविध भागांमध्ये सकाळपासूनच गणरायाच्या मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू होती. अनेक भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात विधिवत स्थापना केली. यासोबतच विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचेही मोठ्या उत्साहात मार्गस्थ करण्यात आले.

गणरायाच्या आगमनामुळे लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला होता. महिला आणि नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांचा निनाद आणि डीजेच्या तालावर गणेशभक्तांनी ठेका धरल्याचे चित्र शहरातील विविध भागात पाहायला मिळाले.

१४० वर्षांची परंपरा लाभलेल्या नाशिककर कुटुंबाचा गणपती

धुळ्यातील गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक आणि पारंपरिक परंपरा लाभली आहे. शहरातील नाशिककर कुटुंबाच्या गणपतीला तब्बल १४० वर्षांची परंपरा लाभली असून, किन्नर आखाड्याच्या गणरायालाही १०० वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पारंपरिक गणेशोत्सवाकडे धुळेकरांचे विशेष लक्ष असते.

चोख पोलीस बंदोबस्त

गणेश चतुर्थीनिमित्त शहरात नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने पोलीस दलाच्या वतीने चौकाचौकात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी आणि गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.

बाप्पाकडे सुख-समृद्धीची प्रार्थना

लाडक्या गणरायाचे स्वागत करताना अनेक गणेशभक्तांनी आपल्या मनातील इच्छा बाप्पाच्या चरणी अर्पण केल्या. भरपूर पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना सुख-समृद्धी मिळू दे, सर्वांना निरोगी आरोग्य लाभू दे आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख-समाधान नांदू दे, अशी प्रार्थना भक्तांनी गणरायाकडे केली.

दरम्यान, बऱ्याच वर्षांनंतर यंदा लाडक्या बाप्पाचा बारा दिवसांचा मुक्काम राहणार असल्याने गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये यंदाच्या गणेशोत्सवाबद्दल मोठी उत्सुकता आणि आनंद पाहायला मिळत आहे.

ढोल-ताशांचा गजर, भक्तांचा जल्लोष आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष… अशा उत्साहपूर्ण वातावरणात धुळ्यात गणेशोत्सवाला दिमाखात सुरुवात झाली आहे.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

Share.
Leave A Reply

Exit mobile version