करंजी बु. येथील ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण अन् हत्या!
४० दिवसांनी थरारक गुन्ह्याचा उलगडा; पारोळा पोलीस व जळगाव LCBच्या संयुक्त तपासात भाचा आरोपी जेरबंद
पारोळा | सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : करंजी बु. येथील राहत्या घरातून ३ ऑगस्ट रोजी सकाळी बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वैजंताबाई गणपत माळी यांच्या रहस्यमय बेपत्ता प्रकरणाचा तब्बल ४० दिवसांनंतर उलगडा झाला आहे. पैशांच्या आणि दागिन्यांच्या हव्यासातून सख्ख्या बहिणीच्या मुलानेच मावशीचे अपहरण करून तिची गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पारोळा पोलिसांच्या संयुक्त पथकाने संशयित प्रशांत उत्तम माळी (वय ४०) याला ताब्यात घेतले असून, त्याच्या कबुलीनंतर वृद्धेचा मृतदेहही हस्तगत करण्यात आला आहे.
बेपत्ता झाल्यानंतर आठवडाभराने तक्रार
वैजंताबाई माळी बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे चुलत पुतणे भैय्यासाहेब हिरामण रोकडे यांनी ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास कैलास साळुंखे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
फिर्यादींच्या आरोपानुसार, सुरुवातीच्या तपासात अपेक्षित गांभीर्य दाखवले गेले नाही. संशयित प्रशांत माळी याला पोलीस ठाण्यात आणूनही त्याच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर फिर्यादींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.
LCBच्या तपासाला सुरुवात
पारोळा पोलिसांच्या तपासाबाबत समाधान न झाल्याने फिर्यादी भैय्यासाहेब रोकडे यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी राहुल कोळी आणि हिरालाल पाटील यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. १५ ऑगस्टपासून LCBच्या पथकाने तपासाला वेग दिला.
दरम्यान, फिर्यादींनी पारोळा पोलीस ठाण्याचे पीआय दीपक पाटील यांची भेट घेऊन तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली. त्यानुसार १९ ऑगस्ट रोजी तपासाची जबाबदारी API अमोल दुकळे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर तपासाला अधिक वेग मिळाला.
१५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले; २५० किलोमीटरचा मागोवा
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि DYSP विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र तपास पथके तयार केली.
तपास पथकाने पारोळा, करंजी, अमळनेर, धरणगाव, घाडोदे, मुक्ताईनगर, यावल, धुळे आणि जळगाव परिसरातील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सुमारे २५० किलोमीटरच्या परिसरातील हालचालींचा मागोवा घेत तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला.
CCTV फुटेज ठरले महत्त्वाचे
तपासादरम्यान ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१६ वाजता प्रशांत माळी हा वैजंताबाईंच्या अंगणात त्यांच्याशी बोलताना दिसून आल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले. त्यानंतर त्याने वैजंताबाईंना भाड्याच्या मारुती स्विफ्ट डिझायर (MH 19 BJ 0071) मध्ये बसवून पारोळ्याच्या दिशेने नेल्याचे फुटेजच्या आधारे समोर आले.
नातेवाईकाच्या मृत्यूची खोटी माहिती देत अपहरण
पोलिसांच्या तपासानुसार, प्रशांत माळी याच्यावर मोठे कर्ज होते. वैजंताबाईंनी अधिक पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याची नजर त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांकडे गेल्याचे तपासात समोर आले.
३ ऑगस्ट रोजी सकाळी ‘शिरसोली येथे नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे’ अशी खोटी माहिती देत त्याने वैजंताबाईंना गाडीत बसवले. त्यानंतर धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात दिवसभर गाडी फिरवत दागिन्यांची मागणी केली. मात्र, वैजंताबाईंनी दागिने देण्यास नकार दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
नंदाळे फाट्याजवळ गळा आवळून हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता धुळ्याजवळील नंदाळे फाट्यावर प्रशांतने रुमालाच्या सहाय्याने वैजंताबाईंचा गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवून तो घरी परतला. ४ ऑगस्टच्या संध्याकाळी कानळदा फाटा सर्व्हिस रोडवरील सिमेंटच्या चारीत मृतदेह टाकून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
४० दिवसांनी आरोपी ताब्यात; मृतदेह हस्तगत
LCB जळगाव आणि पारोळा पोलिसांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक माहिती, CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयित प्रशांत माळी याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.
त्याच्या सांगण्यावरून कानळदा फाट्याजवळील चारीतून वैजंताबाईंचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. आरोपीने काही दागिने धरणगाव, अमळनेर आणि धुळे येथील सोनारांना विकल्याचे, तर काही दागिने धुळ्यातील फागणे परिसरात लपवून ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.
अपहरणाच्या गुन्ह्यात आता हत्या व पुरावा नष्ट करण्याची कलमे वाढणार
पारोळा पोलीस ठाण्यात सुरुवातीला गु.र.नं. ३२२/२०२६ अन्वये BNS कलम १३७(२) आणि १४२ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता वृद्धेची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्याने हत्या आणि पुरावा नष्ट करणे यांसह इतर गंभीर कलमे वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तपास अधिकारी API अमोल दुकळे आणि पारोळा पोलीस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे. तब्बल ४० दिवसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा झाल्याने करंजी बु. परिसरात खळबळ उडाली आहे.
