नानासाहेब देशमुख यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त भडगाव येथे विनम्र अभिवादन
सहकार, कृषी, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाला उजाळा; मान्यवरांनी व्यक्त केल्या आठवणी
भडगाव | गणेश रावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार नेते, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक तसेच पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब बबनराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भडगाव येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे आयोजित या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. डी. भैसे होते.
यावेळी बोलताना डॉ. भैसे यांनी नानासाहेब देशमुख यांच्या सहकार, कृषी, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. नानासाहेब देशमुख हे दातृत्ववान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड देत प्रगतिशील दृष्टिकोन जपला. त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
आठवणींना उजाळा
शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. दिनेश तांदळे आणि मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी नानासाहेब देशमुख यांच्या सहवासातील विविध आठवणींना उजाळा दिला.
डॉ. दिनेश तांदळे यांनी नानासाहेबांच्या शिस्तबद्ध स्वभावाचे आणि सर्वांना सांभाळून घेण्याच्या वृत्तीचे विशेष कौतुक केले. अनेक व्यक्तींना उभे करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता, असे त्यांनी नमूद केले.
“त्यांचा वक्तशीरपणा तरुणांसाठी प्रेरणादायी”
डॉ. अतुल देशमुख यांनी नानासाहेब देशमुख यांच्या कुटुंबवत्सल स्वभावाच्या आठवणी सांगितल्या. ते लहानांसोबत लहानांसारखे तर मोठ्यांसोबत मोठ्यांसारखे वागत. त्यांचा वक्तशीरपणा, काम करण्याची धडाडी आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आजच्या तरुणांसाठी शिकण्यासारखे आहेत, असे त्यांनी सांगितले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी नानासाहेब देशमुख यांचे स्नेहाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांच्या आठवणी सदैव मार्गदर्शक ठरतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले, तर इतिहास विभागप्रमुख डॉ. चित्रा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी प्रा. एस. एम. झाल्टे, डॉ. डी. ए. मस्की, प्रा. डॉ. बी. एस. भालेराव, डॉ. सचिन हडोळतीकर, डॉ. गजानन चौधरी, डॉ. बाळाजी पाटील, डॉ. इंदिरा लोखंडे, प्रा. अर्चना टेमकर, डॉ. जनार्दन देवरे, डॉ. अधिकराव पाटील, प्रा. ज्योती नन्नवरे, प्रा. प्रवीण देसले, डॉ. प्राजक्ता देशमुख, प्रा. अंजली माळी, प्रा. मयूर दायमा, प्रा. श्रद्धा देशमुख, प्रा. निशिगंधा बोरसे, डॉ. सागर पाटील, प्रा. श्रद्धा ठाकूर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नानासाहेब देशमुख यांच्या कार्याला आणि स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
