मुख्याध्यापकांच्या दालनात महिला शिक्षिकेकडून माजी उपमहापौरांना अरेरावी; जयहिंद शाळेतील प्रकार
पाल्यांच्या अडचणींसाठी भेटलेल्या भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाशी गैरवर्तनाचा आरोप; सीसीटीव्ही फुटेजची मागणी
धुळे : पाल्यांच्या विविध शैक्षणिक अडचणींबाबत मुख्याध्यापकांची भेट घेण्यासाठी गेलेल्या भाजपा नगरसेविका तथा माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाशी मुख्याध्यापकांच्या दालनातील एका महिला शिक्षिकेने अरेरावी व गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धुळ्यातील जयहिंद हायस्कूलमध्ये हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पाल्यांच्या शैक्षणिक अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाचे शिष्टमंडळ दुपारच्या सुमारास जयहिंद शैक्षणिक संस्थेत मुख्याध्यापकांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी मुख्याध्यापकांच्या दालनात उपस्थित असलेल्या महिला शिक्षिकेने शिष्टमंडळातील सदस्यांशी अरेरावी केली. तसेच, पाल्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे.
या प्रकारानंतर भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. संबंधित प्रकाराची सत्यता समोर यावी यासाठी मुख्याध्यापकांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, संबंधित शिक्षिकेच्या कथित गैरवर्तनाची चौकशी करून तिच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संस्थाचालकांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, पाल्यांच्या शैक्षणिक हिताच्या प्रश्नावर शाळा प्रशासनाने पालक व लोकप्रतिनिधींशी योग्य पद्धतीने संवाद साधावा, अशी भूमिका भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
यावेळी भाजपा नगरसेविका तथा माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, मोहिनी धात्रक, संगीता चौधरी, छाया पाटील, उर्मिला पाटील, सुनिता पाटील, सीमा फुलपगारे, शीला भडांगे यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
