Spread the love

बोरगाव बु. येथे २६ वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा कायम

ग्रामस्थांच्या एकजुटीतून गणरायाची स्थापना; आकर्षक सजावट, पारंपरिक मिरवणूक आणि भक्तिमय वातावरणाने गाव दुमदुमले

बोरगाव बु. प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील बोरगाव बु. येथे गेल्या २६ वर्षांपासून लोकभावनेतून जपली जात असलेली ‘एक गाव, एक गणपती’ ही सामाजिक ऐक्याची परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने कायम ठेवण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गणरायाची स्थापना करण्यात आली.

सुमारे ५ ते ६ हजार लोकसंख्या असलेल्या बोरगाव बु. गावात ‘एक गाव, एक गणपती’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक एकोपा आणि बंधुभावाची परंपरा जोपासली जात आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गावात आकर्षक सजावट करण्यात आली असून, पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गणेशोत्सव काळात दरवर्षी भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. ‘एक गाव, एक गणपती’च्या माध्यमातून धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक ऐक्य, सहकार्य आणि गावातील एकजूट अधिक मजबूत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ग्रामस्थांच्या सहभागातून सामाजिक एकोप्याचा संदेश

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता तो सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा उत्सव व्हावा, या भावनेतून बोरगाव बु. येथील ग्रामस्थ गेल्या २६ वर्षांपासून ही परंपरा जपत आहेत. गावातील सर्व समाजघटक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत असल्याने ‘एक गाव, एक गणपती’चा आदर्श निर्माण झाला आहे.

गणपती स्थापनेच्या उपक्रमात अध्यक्ष सुदाम निंबा मराठे, उपाध्यक्ष रविंद्र साहेबराव पाटील, सचिव लक्ष्मण भीमराव पाटील तसेच सदस्य सुनील मिठाराम पाटील, लखिचंद्र वामन पाटील, ज्ञानेश्वर उत्तम मराठे, भाईदास पंतिग पाटील, राजू रायभान पाटील, बापू माधवराव चव्हाण, कैलास गंगाराम पाटील, परशुराम नारायण पाटील, भगवान रावण पाटील, शरद शालिग्राम पाटील, किशोर भास्कर नांदळे यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग होता.

पुजारी यशवंत जिवराम भालेराव यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. तसेच हरी विठ्ठल मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.

गणरायाच्या आगमनाने गावात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, २६ वर्षांपासून अखंड सुरू असलेली ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा यंदाही सामाजिक ऐक्याचा संदेश देत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version