Spread the love

कुऱ्हा हरदो शाळेत ‘विद्यार्थी सुरक्षा’ उपक्रम उत्साहात

‘Good Touch–Bad Touch’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे धडे; केंद्रस्तरीय ‘Spelling Bee’ स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

कुऱ्हा हरदो, दि. १५ सप्टेंबर २०२६ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदो येथे शेलवड केंद्राच्या केंद्रप्रमुख आदरणीय प्रतिमा चौधरी मॅडम यांच्या संकल्पनेतून ‘विद्यार्थी सुरक्षा’ अंतर्गत ‘Good Touch–Bad Touch’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी मॅडम यांनी भूषविले. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वागतम् सुस्वागतम्’ या गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी न. ह. राका हायस्कूल येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक तथा समुपदेशक दीपक चौधरी सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘Good Touch–Bad Touch’ या विषयाची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला असणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे सांगितले.

समुपदेशन सत्रात दीपक चौधरी सरांनी विद्यार्थ्यांशी अतिशय आपुलकीने संवाद साधत, सोप्या भाषेत, हसत-खेळत आणि कृतीयुक्त पद्धतीने विद्यार्थी सुरक्षिततेच्या विविध पैलूंची माहिती दिली. विविध चार्टच्या माध्यमातून ‘Good Touch–Bad Touch’ तसेच सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या.

संवादादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या आकलनाची पडताळणी करण्यात आली. योग्य व समर्पक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहनपर पेनचे बक्षीस देण्यात आले.

याप्रसंगी केंद्रस्तरीय ‘Spelling Bee’ स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी मॅडम व समुपदेशक दीपक चौधरी सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

तणावमुक्त व आनंददायी वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसोबतच चांगल्या सवयी अंगीकारणे, आई-वडील व मोठ्यांचा आदर करणे, थोर व्यक्तींची पुस्तके वाचणे, रोजनिशी लिहिणे तसेच सामान्यज्ञान वाढविणे याबाबतही मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. वैशाली संसारे यांनी केले. यावेळी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक आदरणीय कोठाळे दादा तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version