Spread the love

पारोळ्यात महसुली दाव्यांसाठी लोकअदालत

तडजोडीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न; १७ सप्टेंबरला तहसील कार्यालयात आयोजन

पारोळा | प्रतिनिधी – संदीप पाटील : महसूल व वनविभागाच्या दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पारोळा तहसील कार्यालयात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाकडील प्रलंबित अर्धन्यायिक स्वरूपाची प्रकरणे परस्पर तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांच्या स्तरावरील विविध महसूलविषयक दाव्यांचा त्यामध्ये समावेश आहे. प्रलंबित प्रकरणांतील संबंधित पक्षकारांना नोटिसा बजावून लोकअदालतीस उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.

दोन्ही पक्षकारांनी परस्पर संमती दर्शविल्यास संबंधित प्रकरण तडजोडीच्या माध्यमातून प्राधान्याने निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचण्यास मदत होणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महसुली वादांवर सामंजस्याने तोडगा काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

पारोळा तालुक्यातील संबंधित पक्षकार तसेच त्यांचे वकील यांनी गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पारोळा तहसील कार्यालयात आयोजित लोकअदालतीस उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी केले आहे.

या उपक्रमामुळे महसुली प्रकरणांच्या तडजोडीने निपटाऱ्याला चालना मिळून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version