Spread the love

नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने ‘प्लास्टिकमुक्त नशिराबाद’ अभियानाचा शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला विशेष कार्यक्रम

नशिराबाद : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शासनाच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने विविध लोकाभिमुख उपक्रम हाती घेण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘प्लास्टिकमुक्त नशिराबाद’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीराम पेठ, फ्रुटसेल चौकाजवळ, नशिराबाद येथे होणार आहे. कार्यक्रमास खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी जळगाव योगेशकुमार मीना तसेच तहसीलदार जळगाव शीतल राजपूत यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली.

प्लास्टिकमुक्त नशिराबादचा संकल्प

नशिराबाद शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी व पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात नागरिक, व्यापारी, दुकानदार, विद्यार्थी, पालक तसेच शहरातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती तसेच आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. लागू असलेल्या शासन नियमांनुसार प्रतिबंधित प्लास्टिक वस्तूंच्या वापरास आळा घालण्यासाठी नगरपरिषदेकडून कार्यवाही केली जाणार आहे.

प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान, नाले व गटारी तुंबणे, कचरा व्यवस्थापनातील अडचणी तसेच आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

अभियानाच्या यशस्वीतेसाठी नशिराबाद शहरातील नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, पालक, व्यापारी, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमस्थळ : श्रीराम पेठ, फ्रुटसेल चौकाजवळ, नशिराबाद
दिनांक : १७ सप्टेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ४ वाजता
आयोजक : नशिराबाद नगरपरिषद, नशिराबाद

पत्रकार बांधवांना विशेष निमंत्रण

नशिराबाद शहरातील पत्रकार बांधवांना नगरपरिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त नशिराबाद घडविण्यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन नशिराबाद नगरपरिषद प्रशासन, सभापती, गटनेते, नगरसेवक व नगरसेविका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version