Spread the love

‘डिजिटल व्यवहार करा, पण सतर्क राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

OTP, QR कोड, AI व्हॉइस कॉल, फिशिंग लिंकसह ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकारांबाबत मार्गदर्शन; Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन

जळगाव | प्रतिनिधी

डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी विद्यार्थ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे. याच उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Institute of Management and Research College, Jalgaon येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सत्रात स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर फसवणुकीच्या विविध पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. OTPद्वारे होणारी फसवणूक, QR कोडच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक, AI व्हॉइस कॉल, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक तसेच सोशल मीडिया फसवणूक यांची माहिती प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून देण्यात आली.

ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्याचबरोबर मजबूत पासवर्डचा वापर आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू ठेवण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

दरम्यान, क्विक हील फाउंडेशनतर्फे विकसित करण्यात आलेल्या Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण मिळविण्यासाठी या अॅपचा उपयोग कसा करता येईल, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे जनजागृती सत्र प्रभावी ठरले. या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version