१५० वर्षांची गौराई परंपरा आजही कायम
दापोऱ्यात महालक्ष्मी मातेचे थाटामाटात आगमन; ५६ भोगांच्या नैवेद्याने भक्तिमय वातावरण
दापोरा : शैलेश गुरव, जळगाव ग्रामीण (प्रतिनिधी)
दापोरा, ता. जि. जळगाव : येथील श्री. भालचंद्र मुरलीधर गुरव यांच्या परिवारात गेल्या १५० वर्षांपासून अखंड सुरू असलेली महालक्ष्मी माता अर्थात गौराई पूजनाची परंपरा यंदाही मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात जपण्यात आली. दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी महालक्ष्मी मातेचे थाटामाटात आगमन झाले. गौराई मातेच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि मंगलमय वातावरणाने भारून गेला.
पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मी मातेची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. मातेच्या दर्शनासाठी गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. पिढ्यान्पिढ्या जपली गेलेली ही परंपरा आजही त्याच श्रद्धा आणि भक्तिभावाने सुरू असल्याने दापोरा परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित झाले.
५६ भोगांचा नैवेद्य
दि. १८ सप्टेंबर रोजी महाआरतीसह ५६ भोगांचा नैवेद्य महालक्ष्मी मातेला अर्पण करण्यात आला. यावेळी भाविकांनी महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री. प्रकाश भालचंद्र गुरव, श्री. अनिल शंकरराव नाईक आणि श्री. शैलेश भालचंद्र गुरव यांनी केले. त्यांच्या पुढाकारातून गौराई मातेचा भक्तिमय सोहळा उत्साहात पार पडला.
आज गौराई मातेचे विसर्जन
दरम्यान, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी महालक्ष्मी माता अर्थात गौराई यांचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. १५० वर्षांची परंपरा जपत भाविक भक्तिभावाने मातेचा निरोप घेणार आहेत.
