श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव
पंचामृत अभिषेक, ध्वजारोहण, ५६ भोग आणि श्री महाभोमयागाचे आयोजन; पालखी मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम
अमळनेर : श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमेव स्वयंभू मूर्ती असलेल्या अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे. मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने भाद्रपद शुद्ध दशमी, सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिराच्या इतिहासात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा व पवित्र मानला जात असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे.
दिवसभर धार्मिक कार्यक्रम
जन्मोत्सवाची सुरुवात पहाटे ४ वाजता श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेकाने होईल. त्यानंतर सकाळी ६ वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्यात देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा करण्यात येईल.
सकाळी ७ वाजता मंदिरावरील जुने ध्वज विधीवत उतरवून नवीन ध्वज लावण्यात येतील. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची महाआरती करून देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे.
दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी निगडित समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता वाद्यवृंदाच्या साथीने श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून वाजतगाजत पालखी मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महाधुपारती होणार आहे.
भाविकांना दर्शनाचे आवाहन
श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्व भाविकांनी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री मंगळग्रह देवांचे दर्शन तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळ आणि सेवेकऱ्यांनी केले आहे.
मंदिराचे वेगळेपण
खानदेशच्या भूमीला गौरव प्राप्त करून देणारे श्री मंगळग्रह मंदिर महाराष्ट्रासह देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. मंदिरात श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमेव स्वयंभू मूर्ती असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात येते.
या मूर्तीशेजारी भूमीमातेची दाक्षिणात्य शैलीतील मूर्ती तसेच पंचमुखी हनुमानजींची मूर्ती आहे. मंदिर परिसरात भगवान श्री गुरुदत्त-माता श्री अनघालक्ष्मी यांच्या मूर्ती असलेले कमंडलूस्थित मंदिर तसेच भगवान श्री कालभैरव-माता भैरवी यांचे त्रिशूलात्मकस्थित मंदिरही आहे.
श्री मंगळ जन्मोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
