Spread the love

धुळ्यात ‘पुष्पा स्टाईल’ बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त

बंद पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू होता बनावट देशी-विदेशी दारू निर्मितीचा कारखाना; २ लाख ५९ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

धुळे : बंद पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू असलेल्या बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर धुळे दारूबंदी विभागाने छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत बनावट देशी-विदेशी दारू, तयार विदेशी ब्लेंड तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण २ लाख ५९ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील तिखी शिवारात बंद पोल्ट्री फार्मचा आडोसा घेत बनावट दारू निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच तयार दारू आणि विदेशी ब्लेंड आढळून आले.

पोल्ट्री फार्मच्या आडून अशा प्रकारे बनावट दारू निर्मितीचा व्यवसाय सुरू असल्याचे कारवाईत उघडकीस आले. दारूबंदी विभागाने घटनास्थळावरील साहित्य ताब्यात घेत कारखाना उद्ध्वस्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ५९ हजार ७८० रुपये असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू असून, बनावट दारू निर्मितीचा हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच तयार दारूची विक्री कुठे केली जात होती, याबाबत दारूबंदी विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

ही कारवाई दारूबंदी विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त यू. आर. वर्मा आणि अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दुय्यम निरीक्षक डी. जी. गवळी, दुय्यम निरीक्षक एस. एम. मोरे तसेच जवान मनोज धुळेकर, मयूर मोरे, कल्पेश शेलार आणि एन. डी. मोरे यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version