Spread the love

धरणगावच्या रुग्णसेवेला ‘जीपीएस’चे बळ; नवी रुग्णवाहिका जनसेवेत

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील; सहा महिन्यांत सूतगिरणीच्या भूमिपूजनाचा मानस

धरणगाव / जळगाव, दि. १९ (प्रतिनिधी) : धरणगाव शहराच्या विकासाला शासन व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गती देण्यात आली असून, शहरातील विविध विकासकामे प्रगतिपथावर आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू असून बालकवी ठोंबरे स्मारक पूर्णत्वाकडे आले आहे. तसेच विश्रामगृहाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. धरणगाव व जळगाव तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या सहा महिन्यांत धरणगाव येथे सूतगिरणीच्या भूमिपूजनाचा मानस आहे. धरणगाव शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

धरणगाव शहरातील श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयाच्या आवारात जीपीएस परिवारामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जीपीएस परिवाराने सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध सामाजिक व जनोपयोगी उपक्रम राबविले आहेत. नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेली रुग्णवाहिका पांडव बहुउद्देशीय फाउंडेशनकडे संचालनासाठी सोपविण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा लाभ विशेषतः गरजू व सर्वसामान्य रुग्णांना मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

धरणगाव शहर व परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने रुग्णसेवा मिळावी, या उद्देशाने जीपीएस परिवाराने ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. तिचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रुग्णवाहिकेच्या प्रत्यक्ष संचालनाची जबाबदारी पांडव बहुउद्देशीय फाउंडेशनकडे सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, धरणगाव शहरासाठी लवकरच शववाहिका उपलब्ध करून देण्याचा संकल्प असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच पाळधी येथे जीपीएस परिवारामार्फत उभारण्यात येत असलेल्या आधुनिक अभ्यासिकेच्या धर्तीवर धरणगावातही आधुनिक अभ्यासिका उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

युवा नेते तथा जीपीएस परिवाराचे प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएस परिवाराच्या माध्यमातून विविध सामाजिक व जनोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. धरणगावच्या रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली रुग्णवाहिका हा त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपशहरप्रमुख रविंद्र महाजन यांनी केले. प्रास्ताविकात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून धरणगाव शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. तसेच रुग्णवाहिकेची गरज आणि तिच्या उपलब्धतेची पार्श्वभूमी स्पष्ट केली. नगरपालिकेचे माजी गटनेते पप्पू भावे यांनी आभार मानले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी, पी. एम. पाटील सर, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, माजी तालुकाप्रमुख गजानन नाना पाटील, शहरप्रमुख धीरेंद्र पूर्भे, भाजपाचे भगवान महाजन, ॲड. संजय महाजन, कैलास माळी, उद्योगपती शिरीष बयास, वसंतराव भोलाणे, कन्हैया रायपुरकर, न.पा. गटनेते विलास महाजन, नगरसेवक मच्छिंद्र पाटील, सुरेश महाजन, पवन महाजन, सोनू महाजन, तोसिफ पटेल, पप्पू कंखरे, भूषण कंकरे, हर्षल चव्हाण, बाळासाहेब जाधव, वाल्मीक पाटील यांच्यासह जीपीएस परिवार आणि पांडव बहुउद्देशीय फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version