यात्रेतील मंगळसूत्र चोर टोळीचा पर्दाफाश; मेहुणबारे पोलिसांची थरारक कारवाई
तीन पुरुष, दोन महिला अटकेत; विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात — ८ लाख १६ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव | प्रतिनिधी : यात्रेतील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा मेहुणबारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला. लांबे येथील शेंद्रे बाबा यांच्या यात्रेत मंगळसूत्र चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी संशयित पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारचा माग काढत थरारक पाठलाग केला. रहिपुरी गावाबाहेर कार अर्धवट सिमेंटच्या पोलमध्ये अडकल्यानंतर तीन संशयितांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात दोन महिला साथीदारांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकापर्यंत पोलिस पोहोचले.
या कारवाईत तीन पुरुष आणि दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून २४.२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मंगळसूत्रातील सोन्याच्या १७ वाट्या व २४ मणी, तीन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची मारुती डिझायर कार असा एकूण ८ लाख १६ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यात्रेत मंगळसूत्र लंपास
लांबे गावचे ग्रामदैवत असलेल्या शेंद्रे बाबा यांच्या यात्रेत गुरुवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४ वाजता एक महिला यात्रेत फिरत असताना तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी महिलेने शुक्रवारी, दि. १९ सप्टेंबर रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २६३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन चोरी झाल्याने पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने गोपनीय माहिती संकलन सुरू केले.
‘एमएच-१६’च्या धाग्याने पाठलाग
तपासादरम्यान संशयित आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाहनाचा क्रमांक एमएच-१६ असल्याचे समोर आले; मात्र पुढील क्रमांक उपलब्ध नव्हता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जामधा फाटा येथे नाकाबंदी केली.
दरम्यान, चाळीसगावकडून जामधा फाट्याकडे येणारी संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला; मात्र चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने जामधाच्या दिशेने पळवून नेली. त्यानंतर पोलिसांनी शासकीय वाहनासह खासगी मोटारसायकलींच्या मदतीने कारचा पाठलाग सुरू केला.
पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच संशयितांनी कारचा वेग वाढविला. मात्र रहिपुरी गावाबाहेर बोरखेड्याकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या अर्धवट सिमेंटच्या पोलमध्ये अडकली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कारमधील तीन पुरुषांना ताब्यात घेतले.
चौकशीत महिला साथीदारांचा धागा
ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान महिला साथीदारांच्या मदतीने यात्रेत मंगळसूत्र चोरी केल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर रहिपुरी परिसरात शोध घेऊन मोनिका तुकाराम चव्हाण (वय २३, रा. सुंदरनगर, वर्धा) आणि सुभाना राकेश भोसले (वय १९, रा. आर्वी, अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले. एका विधीसंघर्षग्रस्त बालकासही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात सतिष तुकाराम चव्हाण, ओम तुकाराम चव्हाण आणि कुणाल सरनेरसिंग चव्हाण या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीचे दागिने, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली डिझायर कार जप्त केली.
८.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जप्त मुद्देमालामध्ये २४.२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मंगळसूत्रातील १७ सोन्याच्या वाट्या आणि २४ सोन्याचे मणी यांचा समावेश आहे. या सोन्याची किंमत ३ लाख ८० हजार ८८२ रुपये, तीन मोबाईल फोनची किंमत ३६ हजार रुपये, तर पांढऱ्या रंगाच्या मारुती डिझायर कारची किंमत ४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे एकूण ८ लाख १६ हजार ८८२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
चाळीसगाव, नांदगाव, नाशिकमध्येही हात साफ?
चौकशीदरम्यान आरोपींनी यापूर्वी चाळीसगाव, नांदगाव बसस्थानक तसेच नाशिक शहरातील सीबीएस बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे मणी चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या टोळीने आणखी कुठे अशाच प्रकारे चोरी केली आहे का, याचा तपास सुरू आहे.
यात्रा, बाजारपेठा आणि बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. आरोपींच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सह्याद्री बिर्ले यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ किशोर पाटील, शांताराम पवार, देविदास पाटील, मनोज पाटील, प्रकाश कोळी, प्रवीण पाटील, राजेंद्र जाधव, मुकेश देशमुख तसेच पोकॉ विनोद बेलदार आणि कमलेश महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.
