ग्रामसेवक मृत्यूप्रकरणानंतर पोलीस पाटलाला मानसिक त्रासाचा आरोप
खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यांचा दावा; गाव कामगार पोलीस पाटील संघाचे पोलिस प्रशासनाला निवेदन
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) :
पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसेवकाच्या मृत्यूप्रकरणानंतर स्थानिक पोलीस पाटलावर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस पाटलाला मानसिक त्रास देणे, अरेरावी करणे तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचा दावा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाने केला आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या वतीने पारोळा पोलिस प्रशासनाला निवेदन देत संबंधित पोलीस पाटलाला सुरक्षा देण्याची आणि दबाव आणणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शिवरे दिगर येथे १७ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेदरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर ग्रामसेवक पी. एन. पाटील यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर दिवंगत ग्रामसेवकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयितांना अटक केली आहे.
पोलीस पाटलाला घेराव घातल्याचा आरोप
या प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयितांची नावे पोलीस पाटील तुकाराम पाटील यांनीच दिल्याचा आरोप करत संशयितांच्या नातेवाईकांसह सुमारे २५० ते ३०० जणांच्या जमावाने १५ सप्टेंबर २०२६ रोजी पारोळा पोलीस ठाण्याच्या आवारात तुकाराम पाटील यांना घेराव घातल्याचा दावा करण्यात आला आहे.
यावेळी जमावातील काही व्यक्तींनी अरेरावीची भाषा वापरून मानसिक त्रास दिला तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पोलीस पाटलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्या संरक्षणासाठी संघटनेने पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली.
पोलीस पाटील संघ आक्रमक
या घटनेच्या निषेधार्थ १६ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. पोलीस पाटलांना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी तसेच त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
‘अन्याय होऊ देणार नाही’
निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस पाटलांच्या पाठीशी पोलिस प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. पोलीस पाटलांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गावातील कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस पाटील हे महसूल आणि गृह विभागातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक दबाव किंवा दडपण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही पोलिस निरीक्षकांनी सांगितल्याचे संघटनेने नमूद केले.
पोलीस पाटलांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे आणि सक्षमपणे आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहनही पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले.
निवेदन देतेवेळी गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य संघटक भाऊसाहेब पाटील, खान्देश अध्यक्ष प्रवीण गोसावी, जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, जिल्हा सचिव लखीचंद पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष विश्वास शिंदे, तालुका सचिव सुकलाल पाटील, धरणगाव तालुका अध्यक्ष किशोर भदाणे यांच्यासह संघाचे विविध पदाधिकारी तसेच अमळनेर व पारोळा तालुक्यातील बहुसंख्य महिला व पुरुष पोलीस पाटील उपस्थित होते.
