Spread the love

‘महात्मा’ पथनाट्याने जागविला फुले विचारांचा जागर

शिक्षणक्रांती, स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचितांच्या उत्थानाचा संदेश

पाचोरा (प्रतिनिधी) :

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो. से. हायस्कूलमध्ये प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. लीलाधर पाटील लिखित ‘महात्मा’ या पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्यातून महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करताना शिक्षणक्रांती, स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि वंचितांच्या उत्थानाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.

पथनाट्याच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी समाजातील रूढी-परंपरांना दिलेले आव्हान, शिक्षणाच्या माध्यमातून केलेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ आणि स्त्रीशिक्षणासाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे उलगडण्यात आले. सादरीकरणाला उपस्थित विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, शालेय समितीचे खलिल देशमुख, मुख्याध्यापक आर. एल. पाटील, उपमुख्याध्यापक पी. एम. पाटील, पर्यवेक्षक अंजली आर. गोहिल, आर. बी. बांठीया, एम. टी. कौंडिण्य, सांस्कृतिक विभागप्रमुख आर. बी. बोरसे, क्रीडा प्रमुख एस. पी. करंदे, किमान कौशल्य विभागप्रमुख मनीष बाविस्कर, सौ. ए. व्ही. पाटील यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. आर. पाटील यांनी केले, तर आभार आर. बी. बोरसे यांनी मानले. पथनाट्याच्या माध्यमातून फुले विचारांचा जागर घडवून आणल्याबद्दल या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version