विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर फैजपूर पोलिसांची धडक कारवाई
ट्रॅक्टर-ट्रॉलीसह १ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त; एकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल
फैजपूर (प्रतिनिधी : अक्षय वाघ) : विनापरवाना अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर फैजपूर पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह वाळू असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध वाळू चोरी व विनापरवाना वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी फैजपूर शहराजवळील पिंपरुड फाट्याच्या अलीकडे किशोर गुजराती यांच्या टेंडिंग कंपनीजवळ ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ हरी सपकाळे (रा. विरोदा, ता. यावल, जि. जळगाव) हे विनाक्रमांकाच्या स्वराज ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळूची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच फैजपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाकडे वाळू वाहतूक करण्याचा परवाना तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कोणताही वैध परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हवालदार रुपेश पाटील यांच्या फिर्यादीवरून १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५३ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीएनएस गु.र.नं. १९२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) तसेच खाण आणि खनिज (नियमन व विकास) अधिनियम १९५७ मधील कलम २१(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
