Spread the love

वाढदिवसाला समाजसेवेची जोड; शिरसाळा मारोती येथे रक्तदान, मंदिराला २ एसींची भेट

७४ रक्तदात्यांनी केले रक्तदान; पियूष महाजन यांच्याकडून मंदिराला एसी भेट, विजय साठे-संतोष साठे यांची नियमित स्वच्छता सेवा

बोदवड प्रतिनिधी : लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसाळा मारोती येथे रक्तदान शिबिरासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचवेळी मुक्ताईनगर येथील माजी नगरसेवक तथा शिवसेना कार्यकर्ते पियूष महाजन यांनी शिरसाळा मारोती मंदिराला दोन एसी भेट देत मंदिरसेवेत योगदान दिले.

मतदारसंघात दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने यंदा वाढदिवसाचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी घेतला होता. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता समाजोपयोगी उपक्रम राबवून जनसेवा करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिरसाळा मारोती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी शिरसाळा येथील अनिल पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी आभार मानले.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. वैभव दादा पाटील, संभाजी पारधी, अमोल व्यवहारे, अनिल पाटील, भैय्या देशमुख, योगेश पाटील, नितीन बोरसे, चंद्रकांत पाटील, सुरेश कोळी, सागर पाटील, अतुल पाटील आणि संदीप पारधी यांनी सहकार्य केले.

मंदिराला दोन एसींची भेट

शिरसाळा मारोती हे जागृत धार्मिक स्थळ असून मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पियूष महाजन यांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दोन एसी मंदिराला अर्पण केले.

यावेळी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी श्री हनुमान मंदिरात आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत मंदिराला देण्यात आलेल्या दोन एसींचे लोकार्पण करण्यात आले. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून त्यातून श्री बजरंगबलींची सेवा घडावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दर शनिवारी मंदिर परिसराची स्वच्छता

दरम्यान, मलकापूर तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे व कामगार सेना तालुकाप्रमुख संतोष साठे हे आपल्या मित्रपरिवारासह दर शनिवारी शिरसाळा मारोती मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सेवाकार्य करत आहेत. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर राहावा आणि भाविकांना स्वच्छ वातावरणात दर्शन घेता यावे, या उद्देशाने त्यांच्याकडून नियमित श्रमदान केले जाते.

यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या विजय साठे, संतोष साठे व त्यांच्या सहकाऱ्यांची आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी भेट घेतली. सेवाभावी उपक्रमाची माहिती घेत त्यांनी या कार्याचे कौतुक केले.

यावेळी जिल्हा संघटक सुनील भाऊ पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हितेश पाटील सर, प्रशांत भाऊ टोंगे, दीपक माळी, गोपाळ भाऊ सोनवणे, मयूर पाटील, महेंद्र पाटील तसेच रेड प्लस बँकेचे अमोल भाऊ शेलार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.

रक्तदान शिबिर, मंदिराला एसीची भेट आणि दर शनिवारी स्वच्छता सेवेतून श्रमदान, अशा विविध उपक्रमांतून वाढदिवसाला समाजसेवेची जोड देण्यात आली. वाढदिवसाचा खर्च टाळून जनसेवा, मंदिरसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या उपक्रमांतून देण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version