बिलाडीत दोन गटांत मोठा राडा; घरावर दगडफेक, तरुणावर चाकू हल्ला
अजय मोहिते गंभीर जखमी; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल, काही तरुण पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती
धुळे : धुळे तालुक्यातील बिलाडी गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका घरावर दगडफेक करण्यात आल्याचा तसेच एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अजय भाऊसाहेब मोहिते (वय १८) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती आहे.
या प्रकरणी प्रवीण मोहिते यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात रोहित भील, सागर भील यांच्यासह इतर गावातील सुमारे १५ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती असून, इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
घरावर दगडफेक केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, बिलाडी गावात सायंकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मोहिते कुटुंबीयांच्या आरोपानुसार, रोहित भील व सागर भील यांनी इतर गावांतील काही तरुणांना बोलावून मोहिते यांच्या घरावर दगडफेक केली. याचदरम्यान तरुणावर चाकूने हल्ला झाल्याचा आरोप आहे.
सायंकाळी सुरू झालेला हा वाद रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे मोहिते कुटुंबीयांनी सांगितले. घटनेनंतर जखमी अजय मोहिते याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
या घटनेप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहिते कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, सध्या बिलाडी गावात परिस्थिती शांत असल्याची माहिती असून, पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या घटनेनंतर माणिक गवा मोहिते, नारायण मोहिते, भटू मोहिते, किशोर मोहिते, रवींद्र जाधव, पांडुरंग मोहिते, हौशीलाल मोहिते, देविदास जाधव, भाऊसाहेब मोहिते, ताराबाई मोहिते, कलुबाई मोहिते, बेबाबाई मोहिते, छायाबाई मोहिते, चंद्रकला मोहिते, मीना मोहिते यांच्यासह मोहिते कुटुंबीय उपस्थित होते.
