Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक अधिकारिता शिबिर

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना सहाय्यक उपकरणांचे वितरण; राष्ट्रीय वयोश्री व एडीआयपी योजनांचा लाभ

पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त जळगाव येथे सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजना तसेच एडीआयपी योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थींना त्यांच्या गरजेनुसार विविध सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले.

शिबिरात लाभार्थींना इलेक्ट्रिक सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, काठ्या तसेच इतर आवश्यक सहाय्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपकरणांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन कामकाजात अधिक सुलभता मिळण्यास मदत होणार असून, त्यांच्या स्वावलंबनाला आणि सामाजिक सहभागाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शासकीय योजनांचा लाभ गरजू लाभार्थींपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविण्याच्या उद्देशाने अशा सामाजिक अधिकारिता शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सहाय्यक उपकरणांमुळे लाभार्थींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन त्यांना अधिक सन्मानपूर्वक जीवन जगण्यास मदत होऊ शकते.

केंद्र सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या घोषवाक्याचा उल्लेख करत समाजातील विविध घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमालाताई काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगर अध्यक्ष दिपकदादा सूर्यवंशी, उज्ज्वलाताई बेंडाळे, प्रकाश बालाणी, राहुल सुरेश पाटील, एस. पी. गणेशकर आणि पी. एस. म्हसके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संबंधित अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून सहाय्यक उपकरणांचा लाभ मिळाल्याने लाभार्थींना त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक स्वावलंबीपणे वावरण्यास मदत होणार असल्याचे उपस्थितांकडून नमूद करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version