Spread the love

भुसावळ तालुकास्तरीय शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

“युवकांनी मैदानाकडे वळून नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करावा” — ना. संजय सावकारे

भुसावळ | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भुसावळ तालुकास्तरीय शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथे उत्साहात सुरुवात झाली. विविध शाळांमधील तब्बल ३२ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर, बियाणी स्कूलचे प्राचार्य डी. एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी मुकेश मोरे, विलास पाटील, हिम्मत पाटील यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

खेळातून निरोगी व नशामुक्त समाजाची निर्मिती

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ना. संजय सावकारे म्हणाले की, भारत हा युवाशक्तीचा देश असून देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताकद, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होतो.

आजच्या काळात युवकांसमोर अनेक आव्हाने असून त्यामध्ये व्यसनाधीनता ही गंभीर समस्या आहे. नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच इतरांनाही व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. मोबाईल आणि अन्य व्यसनांमध्ये वेळ घालविण्याऐवजी युवकांनी अधिकाधिक वेळ मैदानावर घालवावा, असे आवाहन त्यांनी केले.

खेळ केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून तो जीवन जगण्याची शिस्त शिकवतो. विजय-पराजय हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. पराभवातून शिकून पुन्हा जोमाने उभे राहणे, प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करणे आणि संघभावनेने काम करणे हीच खरी क्रीडा संस्कृती असल्याचे सावकारे यांनी सांगितले.

युवकांनी क्रीडा क्षेत्रातील आपली गुणवत्ता सिद्ध करून तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भुसावळचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

खो-खो स्पर्धेतील विजेते

मुलांच्या १९ वर्षे वयोगटात गंगाधर सांडू चौधरी विद्यालयाचा संघ विजेता, तर महात्मा गांधी विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.

१७ वर्षे वयोगटात महर्षी व्यास विद्यालय, वेल्हाळेचा संघ विजेता, तर दादासाहेब दाबू पांडू पाटील विद्यालय, सोनगावचा संघ उपविजेता ठरला.

१४ वर्षे वयोगटातही महर्षी व्यास विद्यालय, वेल्हाळेचा संघ विजेता, तर महात्मा गांधी विद्यालय, वरणगावचा संघ उपविजेता ठरला.

हॉलीबॉल स्पर्धेतील निकाल

मुलींच्या १७ वर्षे वयोगटात पंडित नेहरू विद्यालय, वराडसीमचा संघ प्रथम, तर अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचा संघ द्वितीय क्रमांकावर राहिला.

१४ वर्षे वयोगटात अहिल्यादेवी विद्यालयाचा संघ प्रथम, तर बियाणी पब्लिक स्कूलचा संघ द्वितीय ठरला.

क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून बजावली जबाबदारी

स्पर्धेतील पंच म्हणून डॉ. प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील, हिम्मत पाटील, मुकेश मोरे, योगी राठोड, नामदेव चव्हाण, निलेश राजपूत, दत्तू अहिरे, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी, गणेश बोदडे, वंदना ठोके, अर्चना राजपूत आदींनी जबाबदारी पार पाडली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या निमित्ताने बियाणी मिलिटरी स्कूलचे मैदान विद्यार्थी खेळाडूंच्या उत्साहाने आणि क्रीडा कौशल्याने गजबजून गेले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version