Spread the love

अक्कलकुव्यात ‘अमृत शासन संवाद सेतू’; विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती समजली

विद्यार्थी आणि प्रशासनातील विश्वासाचे नाते दृढ करणारा अभिनव उपक्रम; १२० ते १५० विद्यार्थ्यांचा सहभाग

अक्कलकुवा | प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम अक्कलकुवा येथे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत शासन संवाद सेतू’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावी, नागरिकांमध्ये सुजाण नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी आणि विद्यार्थी व प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने अक्कलकुवा तहसीलदार तथा दंडाधिकारी कार्यालयात हा उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमात तहसीलदार विनायक घुमरे यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तहसील कार्यालयातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची माहिती करून दिली. यामध्ये पुरवठा विभाग, महसूल विभाग, निवडणूक विभाग, कोषागार विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग आदींचा समावेश होता.

कागदपत्रे, दाखले आणि शासन योजनांची माहिती

नागरिकांना विविध प्रकारची कागदपत्रे व दाखले कसे मिळविता येतात, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, कोणत्या कामासाठी कोणत्या विभागाशी संपर्क साधावा, अर्जाची प्रक्रिया कशी असते, विविध योजनांसाठी कोणत्या अटी व वयोमर्यादा आहेत तसेच शासनाच्या योजनांचा लाभ कोणाला आणि कशा पद्धतीने मिळतो, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

प्रशासनातील विविध विभाग प्रत्यक्ष पाहण्याची आणि अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

‘शेतकरी कुटुंबातील मुलगा मेहनतीने इथपर्यंत पोहोचू शकतो…’

यावेळी तहसीलदार विनायक घुमरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या जीवनप्रवासाची माहिती दिली. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर प्रशासकीय सेवेत स्थान मिळवू शकते, तर विद्यार्थ्यांनीही शिक्षणात सातत्य ठेवून आपल्या ध्येयासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

“चांगला अभ्यास करा, मेहनत करा. अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ न घालवता देशाच्या विकासात आपला मोलाचा वाटा द्या,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

अधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांशी थेट संवाद

तहसीलदार घुमरे यांनी ३० ते ३५ विद्यार्थ्यांच्या गटांना आपल्या दालनात बोलावून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी प्रशासनातील कामकाज आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती दिली. या प्रत्यक्ष संवादामुळे प्रशासनाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासन व प्रशासनाच्या कामकाजाची अचूक माहिती मिळाली असून, भविष्यात विविध शासकीय कामांसाठी त्यांना या माहितीचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढल्याची भावना सोबत आलेल्या सावित्रीबाई फुले विद्यालयातील प्राध्यापकांनी व्यक्त केली.

१५० विद्यार्थ्यांचा सहभाग

या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले विद्यालय आणि विद्या विकास महाविद्यालयातील सुमारे १२० ते १५० विद्यार्थी उपस्थित होते. प्रशासनाची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गणेश चौधरी यांनी केले. विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात संवादाचे माध्यम निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version