लक्झरीतून ५३८५ किलो माव्याची वाहतूक रोखली; एफडीएची मोठी कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद-अकोला मार्गावरील कारवाई; १६.५२ लाखांचा मावा जप्त, चालक-क्लीनर ताब्यात
धुळे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाईसाठी वापरल्या जाणाऱ्या माव्याच्या वाहतुकीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. अहमदाबादहून अकोल्याच्या दिशेने लक्झरी बसमधून वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल ५ हजार ३८५ किलो मावा (खवा) मोराणे हद्दीत अन्न व औषध प्रशासनाने धुळे तालुका पोलिसांच्या मदतीने पकडला. विविध कंपन्यांचा १३ प्रकारचा हा मावा असून त्याची अंदाजे किंमत १६ लाख ५२ हजार १०० रुपये आहे.
या कारवाईत माव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
माहिती मिळताच सापळा; लक्झरी बस अडवली
गणेशोत्सवाच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या माव्याची मोठ्या प्रमाणात अहमदाबादहून अकोल्याच्या दिशेने वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर एफडीएच्या पथकाने धुळे तालुका पोलिसांच्या सहकार्याने संबंधित मार्गावर सापळा रचला.
यावेळी अशोक लेलँड कंपनीची वेलकम लक्झरी बस (क्रमांक एमपी-४४ झेडएफ-७२१४) अडवून तिची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान बसमध्ये मोठ्या प्रमाणात मावा आढळून आला. प्रशासनाने हा माल जप्त करून त्याचे नमुने प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पाठविले आहेत.
१३ प्रकारचा मावा जप्त
कारवाईदरम्यान विविध कंपन्यांचा १३ प्रकारचा एकूण ५ हजार ३८५ किलो मावा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची किंमत १६ लाख ५२ हजार १०० रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
मात्र, जप्त मावा भेसळयुक्त आहे की नाही, याबाबतचा अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
चालक व क्लीनर ताब्यात
या प्रकरणी जगदीश मानजी पाटीदार, महेंद्रसिंग परबतसिंग राठोड (वाहनचालक) आणि राजकुमार रोशनलाल आचार्य (क्लीनर) यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जप्त केलेल्या माव्याच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर प्रकरणातील पुढील कारवाई निश्चित होणार आहे.
एफडीएच्या पथकाची संयुक्त कारवाई
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मंगेश माने, सहाय्यक आयुक्त गोपाल माहोरे, अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत, मंगेश भावसार तसेच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खाकीदा सय्यद, सतीश कोठावदे आणि पंकज पाटील यांच्या पथकाने केली.
गणेशोत्सवाच्या काळात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मिळाला आहे.
