Spread the love

नशिराबाद पोलिसांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती मोहीम

विविध गणेश मंडळांना भेटी देत पदाधिकारी व नागरिकांशी संवाद; सायबर फसवणूक, दागिने चोरी, वाहतूक नियमांसह डायल ११२ बाबत मार्गदर्शन

नशिराबाद : प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस पथकाने शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष भेटी देत मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधला.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून मंडळांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच गणेश मंडपांमध्ये विविध विषयांवरील माहितीपर पोस्टर्स लावून नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात आली.

सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी, एटीएम, बँक खाते किंवा अन्य वैयक्तिक आर्थिक माहिती कोणाशीही शेअर करू नये, असे मार्गदर्शन करण्यात आले.

आपत्कालीन मदतीसाठी डायल ११२

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने पोलिसांची मदत घेण्यासाठी डायल ११२ या २४ तास उपलब्ध असलेल्या हेल्पलाइनचा वापर करावा, अशी माहिती देण्यात आली. उत्सवादरम्यान काही अनुचित प्रकार किंवा संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले.

गर्दीच्या ठिकाणी दागिने चोरीबाबत सतर्कता

गणेशोत्सवात दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने गर्दीचा गैरफायदा घेऊन सोनसाखळी किंवा दागिने चोरीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता महिलांनी विशेष सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात आल्या. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही मंडप व परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, असे पोलिसांनी सांगितले.

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा

उत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने उभी करू नयेत. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची मंडळांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवणे तसेच गणेशोत्सव काळात पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करणे, याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

नशिराबाद पोलिसांच्या या जनजागृती मोहिमेमुळे गणेशोत्सव काळातील सुरक्षा आणि नागरिकांच्या जबाबदारीबाबत मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version