मंडळ अधिकारी योगिता पाटील यांच्यावर बनावट रेल्वे तिकिटांप्रकरणी गुन्हा!
प्रवासभत्ता लाटल्याचा आरोप; PNR व Transaction ID समान आढळल्याने जिल्हापेठ पोलिसांत कारवाई
पारोळा / सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दरम्यान निवडणूक साहित्य आणण्यासाठी केलेल्या प्रवासाच्या खर्चाच्या देयकांसोबत कथित बनावट रेल्वे तिकिटे सादर करून शासकीय निधीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नशिराबाद येथील मंडळ अधिकारी तथा तत्कालीन सहाय्यक महसूल अधिकारी श्रीमती योगिता पाटील यांच्याविरुद्ध जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी केलेल्या प्रवासाचा खर्च मिळण्यासाठी सादर करण्यात आलेल्या देयकांसोबत जोडलेल्या रेल्वे तिकिटांबाबत जुलै आणि सप्टेंबर २०२६ मध्ये दैनिक ‘दिव्य मराठी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा RTI Trainer & Social Activist दिपककुमार पी. गुप्ता यांनी तक्रार अर्जाद्वारे केली होती.
अभिलेख व प्रवास देयकांची तपासणी
तक्रार अर्ज आणि वृत्तपत्रातील वृत्तांच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक शाखा व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित अभिलेख, प्रवास देयके आणि त्यासोबत जोडण्यात आलेल्या रेल्वे तिकिटांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान योगिता पाटील यांनी सादर केलेल्या काही रेल्वे तिकिटांवरील PNR Number आणि Transaction ID समान असल्याचे निदर्शनास आल्याचे संबंधित चौकशीच्या नोंदींमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित तिकिटे प्रथमदर्शनी बनावट असल्याचा संशय निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर फौजदारी कारवाई
प्रकरणाची चौकशी आणि उपलब्ध अभिलेखांच्या आधारे फौजदारी कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली. त्यानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन फौजदारी कारवाईचे आदेश दिले.
या कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांना अधिकृत करण्यात आले होते. त्यानुसार राहुल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २१ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
पोलिसांनी गुन्हा रजि. क्र. ०३१६/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील नमूद कलमांनुसार कारवाई केली आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, जिल्हापेठ पोलीस ठाणे, जळगाव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी यापूर्वी दिलेल्या तक्रारीवरून आता रीतसर गुन्हा दाखल झाल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना पत्राद्वारे कळविली आहे.
महसूल वर्तुळात खळबळ
निवडणूक कामाशी संबंधित प्रवास देयकांमध्ये कथित बनावट रेल्वे तिकिटांचा वापर केल्याच्या आरोपावरून महसूल विभागातील अधिकाऱ्याविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने जळगाव जिल्ह्यातील महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता, संबंधित तिकिटांची निर्मिती व वापर तसेच शासकीय निधीच्या व्यवहारातील नेमकी स्थिती याबाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. गुन्हा दाखल होणे म्हणजे आरोप सिद्ध होणे नव्हे; पुढील तपास व न्यायालयीन प्रक्रियेतूनच प्रकरणातील तथ्य स्पष्ट होणार आहे.
