पाचोऱ्यात उद्या बच्चू कडू यांचा ‘शिवसंवाद दौरा’
शेतकरी, दिव्यांग, गोरगरीबांसह विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद; पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती
पाचोरा, दि. २३ (वार्ताहर) : संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पाचोरा येथे गुरुवारी (दि. २४) ‘शिवसंवाद दौऱ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजता जुना सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार आहे.
शेतकरी, गोरगरीब, दिव्यांग तसेच विविध सामाजिक घटकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्याशी संवाद साधणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी नागरिक व कार्यकर्त्यांशी बच्चू कडू यांच्यासह जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार दिलीप लांडे आणि पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमात मतदारसंघातील विविध प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, दिव्यांगांच्या समस्या तसेच सामाजिक घटकांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. नागरिकांना आपले प्रश्न थेट मांडण्याची संधी या संवादातून मिळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमास जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार दिलीपमामा लांडे, रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आमदार तुकाराम काते तसेच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याबरोबरच सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, दिव्यांग बांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
