Spread the love

सेवा सेतू पर्वातून ग्राहकांना योजनांची माहिती

जळगाव विभागात महावितरणचे जनजागृती अभियान; संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते माहिती व सेवा केंद्राचे उद्घाटन

जळगाव ग्रामीण / शैलेश गुरव (प्रतिनिधी) : महावितरणच्या ‘सेवा सेतू पर्वा’अंतर्गत जळगाव विभागात ग्राहक जनजागृती अभियान राबविण्यात आले. ग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा, योजना आणि सुविधांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या माहिती व सेवा केंद्राचे (Kiosk) उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी राजेंद्र पवार यांनी माहिती व सेवा केंद्रास भेट देऊन ग्राहक सेवा उपक्रमाची पाहणी केली. केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध असलेल्या विविध सेवा व योजनांची माहिती देण्यात आली. तसेच ग्राहकांच्या विविध प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन करण्यात आले.

‘सूर्यघर’ योजनेची विशेष जनजागृती

अभियानादरम्यान प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तसेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (स्मार्ट) सोलर योजना याबाबत ग्राहकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. घरांच्या छतावर रूफटॉप सोलर यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया, उपलब्ध शासकीय योजना, ग्राहकांना मिळणारे संभाव्य फायदे तसेच सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज बचत करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर वाढविण्यासोबतच ग्राहकांमध्ये ऊर्जा बचतीबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही या अभियानात भर देण्यात आला. महावितरणच्या सेवा, योजना आणि ग्राहकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व सेवा केंद्र उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी अधीक्षक अभियंता सांगळे (जळगाव मंडळ), कार्यकारी अभियंता साळी (जळगाव विभाग), नायब तहसीलदार लाडवंजारी (प्रांत कार्यालय) यांच्यासह कापुरे, वाणी, मराठे, म्हसणे, तडवी, सपकाळे, नागरे, मोरे आदी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सेवा सेतू पर्वा’च्या माध्यमातून ग्राहकांना विविध सेवा व योजनांची माहिती देण्यासोबतच सौरऊर्जा, ऊर्जा बचत आणि उपलब्ध सुविधांबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम महावितरणकडून राबविण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version