Spread the love

२८ सप्टेंबरला माहिती अधिकार दिन व लोकशाही दिवस साजरा करा

माहिती अधिकार फेडरेशनतर्फे पोलीस निरीक्षक गायकवाड यांना निवेदन; जनजागृती कार्यक्रम घेण्याची मागणी

धरणगाव | प्रतिनिधी : शासनाच्या २० सप्टेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून धरणगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन व लोकशाही दिवस साजरा करण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार फेडरेशनच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात माहिती अधिकार फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, नागरिकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती मिळावी, तसेच शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढावे, यासाठी २८ सप्टेंबर रोजी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

नागरिकांना अधिकारांची माहिती देण्याची गरज

माहितीचा अधिकार कायद्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाशी संबंधित माहिती मागविण्याचा महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा योग्य आणि प्रभावी वापर कसा करावा, माहितीचा अर्ज कसा करावा, नागरिकांना कोणत्या बाबींची माहिती मागता येते, याबाबत मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी माहितीचा अधिकार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे शासन निर्णयानुसार २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन प्रभावीपणे साजरा करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी माहिती अधिकार फेडरेशनचे जळगाव जिल्हा प्रचार प्रमुख मोहन शिंदे, तालुका अध्यक्ष प्रेमराज पाटील, सदस्य कैलास महाजन आणि राजेंद्र मोरे उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version