Spread the love

बनावट दारू बनवण्याचा प्लॅन उध्वस्त!

१,२५० लिटर स्पिरिटसह लाखोंचा मुद्देमाल जप्त; वाहनांसह दोघांना अटक, आझादनगर पोलिसांची कारवाई

धुळे प्रतिनिधी : बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरिटची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आझादनगर पोलिसांनी कारवाई करत १,२५० लिटर स्पिरिटसह दोन संशयितांना वाहनांसह ताब्यात घेतले. पांजरा नदीलगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकून करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पांजरा नदीलगतच्या परिसरात कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार पोलिस पथकाने संबंधित पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. यावेळी स्पिरिटची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून विनोद बन्सीलाल फुलपगारे (वय ४७, रा. भोई गल्ली, जुने धुळे) आणि जितेंद्र सेवाराम टेकवाणी (वय ४७, रा. कुमारनगर, साक्री रोड, धुळे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत १,२५० लिटर स्पिरिट तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पिरिटचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, त्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच बनावट दारू निर्मितीशी या प्रकरणाचा संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या कारवाईमुळे बनावट दारू निर्मितीचा संभाव्य प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांच्या तपासात या प्रकरणामागील संपूर्ण साखळी समोर येण्याची शक्यता आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

कारवाईच्या पथकात पोलीस अंमलदार तुषार जाधव, गौतम सपकाळे, विनोद सरदार, योगेश शिरसाट, संदीप कडरे, शांतीलाल सोनवणे, मनोज बागुल, मकसूद पठाण आणि पंकज जोंधळे यांचा समावेश होता. पुढील तपास आझादनगर पोलिसांकडून सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version