साकरे शिवारात वीज कोसळून १६ बकऱ्या ठार
मजूर थोडक्यात बचावले; पंचनामा करून पीडितांना तातडीने नुकसानभरपाई द्या, गुलाबराव वाघ यांची मागणी
धरणगाव | प्रशांत शिंदे (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील साकरे शिवारात बुधवारी (दि. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसादरम्यान वीज कोसळून १६ बकऱ्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेत बकऱ्या चारण्यासाठी गेलेले मजूर सुदैवाने थोडक्यात बचावले. घटनेमुळे पीडित मजूरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वीज कोसळल्याची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ आणि तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेची माहिती त्यांनी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना दिली. मृत बकऱ्यांचा तातडीने पंचनामा करून पीडित मजूरांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
मजुरांचे मोठे नुकसान
आबा पाटील, गोकुळ पाटील, नारायण पारधी, भगवान पारधी आणि जामलाल पारधी यांच्या मालकीच्या बकऱ्या वीज कोसळल्याने ठार झाल्या. बकऱ्यांवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने या घटनेमुळे संबंधित मजूर कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
दरम्यान, धरणगावचे पशुवैद्यकीय अधिकारी गौरव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बकऱ्यांचा पंचनामा केला. शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादीचे मोहन पाटील सर, भाऊसाहेब पाटील, दिनेश भदाणे, तलाठी संदेश महाजन, पोलीस पाटील घनश्याम पाटील, कोतवाल शितल कुमार पवार, किशोर पाटील तसेच शिवसेनेचे मीडिया प्रमुख गजानन महाजन उपस्थित होते.
