Spread the love

पारोळा तालुक्याला दुष्काळ घोषित करा!

ब्रिक्स हुमन राईट्स मिशन संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी

पारोळा / सुरेश पाटोळे (प्रतिनिधी)

पारोळा : चालू खरीप हंगामात पारोळा तालुक्यात अपेक्षित प्रमाणात तसेच नियमित स्वरूपात पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांतील पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पावसातील खंड आणि अपुऱ्या पर्जन्यमानामुळे पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिक्स हुमन राईट्स मिशन संघटनेच्या वतीने तहसीलदार, पारोळा यांना निवेदन देऊन तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यासह बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात पारोळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये पर्जन्यमान आणि पिकांच्या सद्यस्थितीची महसूल व कृषी विभागामार्फत संयुक्त पाहणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पावसाअभावी किंवा पावसातील दीर्घ खंडामुळे बाधित झालेल्या पिकांचे गावनिहाय व पिकनिहाय वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करण्याची मागणी करण्यात आली.

संबंधित शासकीय निकषांची पूर्तता होत असल्यास पारोळा तालुका दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे तातडीने सादर करावा. पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार अनुज्ञेय आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

पीक विमा, चारा-पाणी आणि पिण्याच्या पाण्याचीही मागणी

पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध दुष्काळ निवारण व कृषीविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तालुक्यातील जनावरांसाठी आवश्यकतेनुसार चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पूर्वतयारी करावी. संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांचा आढावा घेऊन गरजेनुसार पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

निवेदन देताना जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कमलेश सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल सरदार, शहराध्यक्ष सागर माळी, जिल्हा सचिव भैय्या पाटील, आरोग्य तालुका प्रमुख जाकीर पिंजारी, उत्तर महाराष्ट्र सचिव चंद्रकांत सोनवणे, तालुका सचिव श्रीकांत सोनवणे आणि तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकरी आणि शेतमजुरांच्या हिताचा विचार करून निवेदनावर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करावी आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार त्वरित मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ब्रिक्स हुमन राईट्स मिशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version