Spread the love

धरणगावात शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात

‘शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान’ — गुलाबराव वाघ

धरणगाव प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दुसरा शिवराज्याभिषेक दिन (शाक्त राज्याभिषेक दिन) तसेच सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी, पुरोगामी व सामाजिक न्यायाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केले. त्यांनी शाक्त राज्याभिषेक दिन तसेच सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा इतिहास आणि त्यामागील सामाजिक विचार उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासही माल्यार्पण करण्यात आले.

संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी महापुरुषांच्या घोषणांचा जयघोष करत वातावरणात उत्साह निर्माण केला.

यावेळी बोलताना शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ यांनी, “शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान आहेत,” असे प्रतिपादन केले. सामाजिक समता, शिक्षण, न्याय आणि मानवमुक्तीचा विचार पुढे नेण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, माळी समाजाध्यक्ष व्ही. टी. माळी, पाटील समाजाध्यक्ष माधवराव पाटील, काँग्रेसचे ओबीसी राज्य सचिव रामचंद्र महाजन, शिवसेनेचे गटनेते विलास महाजन, प्रा. भदाणे, सचिव आर. डी. महाजन, नगरसेविका हेमांगी किरण अग्निहोत्री, काँग्रेस नेते सुनील सोनार, राजेंद्र महाजन, पत्रकार विकास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

तसेच माहिती अधिकार कायदा संघाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक समाजाचे प्रचारक एच. डी. माळी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, संत सावता माळी युवक संघाचे विभागीय अध्यक्ष विनायक महाजन, तालुकाध्यक्ष दिनेश महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र महाजन, सामाजिक कार्यकर्ते भीमराव पाटील, सूरज वाघरे, सुधाकर मोरे, डी. ए. पाटील, गोपाल महाजन, सोमनाथ चित्ते, भैय्या धनगर, गुलाब महाजन यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधक विचार मंच, धरणगाव संत सावता माळी युवक संघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि धरणगाव सत्यशोधक समाज संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version