आरोग्य शिक्षणासाठी माहिती, शिक्षण व संवाद यंत्रणा अधिक सक्षम करा
आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सूचना; जनजागृतीसाठी लोकसहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर
मुंबई, दि. २३ : आरोग्यविषयक योजना व कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासोबतच त्यांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद (आयईसी) विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जनजागृती, लोकसहभाग आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून आरोग्य शिक्षणाला व्यापक स्वरूप देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहिती, शिक्षण व संवाद विभागाच्या कामकाजाचा तसेच प्रगतीचा आढावा आरोग्य भवन, मुंबई येथे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, आरोग्यविषयक जनजागृती करताना केवळ माहितीचे प्रसारण न करता नागरिकांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे हा संवादाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. आरोग्य मोहिमा, विविध आरोग्य दिन, सण-उत्सव तसेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन आयईसी उपक्रमांचे नियोजन करावे. लोकसहभाग वाढविण्यासाठी सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि प्रसारमाध्यमांचा समन्वयाने सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
माध्यमनिहाय प्रभावी अंमलबजावणीवर भर
वार्षिक कार्यक्रमानुसार आयईसी उपक्रमांचे नियोजन करून कार्यक्रमनिहाय मंजूर उपक्रमांची माध्यमनिहाय प्रभावी अंमलबजावणी करावी. माहिती व जनसंपर्क विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच राज्यस्तरीय आयईसी अनुदानाच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करून आवश्यक मान्यता घेऊन उपक्रम राबवावेत. जिल्हास्तरावरील आयईसी उपक्रम जिल्हा विस्तार व माध्यम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवून त्याचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
आरोग्य मोहिमांसाठी आवश्यक माहिती व जनजागृती साहित्य संबंधित कार्यक्रमांच्या उद्दिष्टांनुसार तयार करून त्याचे योग्य पद्धतीने वितरण करावे. जिल्हास्तरीय आयईसी उपक्रमांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देतानाच विविध आरोग्य कार्यक्रमांसाठी प्रभावी व लोकाभिमुख जनजागृती साहित्य निर्मितीवर भर द्यावा. महाराष्ट्र आरोग्य पत्रिकेचे नियमित प्रकाशन तसेच आयईसी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
‘आरोग्य दूत’ उपक्रमाला चालना
वर्तणूक बदल संवाद (बीसीसी) अधिक प्रभावी करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम विकसित करावेत. यामध्ये स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेण्यावर भर द्यावा. राज्यातील स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय सेवा योजना, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, रेल्वे आऊटरीच ब्युरो तसेच राष्ट्रीय छात्रसेना यांसारख्या संस्थांशी समन्वय साधून आयईसी आणि बीसीसी उपक्रमांना व्यापक स्वरूप द्यावे, असे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
पत्रकारांसाठी ‘आरोग्य दूत’, विद्यार्थ्यांसाठी ‘आरोग्य दूत’ तसेच जिल्हा व तालुकास्तरावर ‘आरोग्य दूत’ उपक्रम राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. आरोग्यविषयक अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार, विद्यार्थी आणि स्थानिक पातळीवरील विविध घटकांना सहभागी करून घेण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आयुक्त संजय काटकर, आयुक्त (शहरी) डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव राजश्री सारंग, उपसंचालक (आयईसी) डॉ. भगवान पवार, सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
