Spread the love

गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्युत सुरक्षा व ऊर्जा बचतीचे धडे

विद्यार्थ्यांना विद्युत अपघात टाळण्यासाठी खबरदारीसह हरित ऊर्जा व सौरऊर्जेचे महत्त्व पटवून दिले

शैलेश गुरव, जळगाव ग्रामीण (प्रतिनिधी)

जळगाव, दि. २४ सप्टेंबर २०२६ : महावितरणच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असोदा कक्षाच्या वतीने जळगाव–भुसावळ रोडवरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि ऊर्जा बचत या विषयांवर जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भविष्यातील अभियंत्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत सजगता निर्माण करण्यासोबतच ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमात असोदा कक्षाचे कनिष्ठ अभियंता धिरज राजू तायडे यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्युत उपकरणांचा योग्य व सुरक्षित वापर, उपकरणांची हाताळणी करताना घ्यावयाची खबरदारी तसेच विजेपासून होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपायांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी विद्युत सुरक्षेबरोबरच वीज बचतीचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले. अनावश्यक विद्युत उपकरणे बंद ठेवणे, विजेचा काटकसरीने वापर करणे आणि उपलब्ध ऊर्जेचा कार्यक्षम पद्धतीने वापर करण्याच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच हरित ऊर्जा आणि सौरऊर्जेचा वाढता वापर याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौरऊर्जेसारख्या पर्यायी व स्वच्छ ऊर्जास्रोतांचा वापर वाढविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. ऊर्जा संवर्धन ही केवळ शासन किंवा संबंधित यंत्रणांची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

भविष्यातील अभियंते म्हणून विद्यार्थ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यासोबतच सुरक्षित, कार्यक्षम आणि ऊर्जा-सक्षम तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सजग राहावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, संबंधित कर्मचारी तसेच महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा बचतीसंदर्भातील मार्गदर्शनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version