Spread the love

सुरभी मित्र मंडळातर्फे नशिराबाद अण्णानगर येथे गणेशोत्सवानिमित्त ‘छप्पन भोग’

कार्यक्रमाचे भव्य आयोजन!

नशिराबाद : गणेशोत्सवानिमित्त नशिराबाद येथील अण्णानगर परिसरात सुरभी मित्र मंडळाच्या वतीने भक्तिमय वातावरणात आकर्षक ‘छप्पन भोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बाप्पाच्या चरणी ५६ विविध प्रकारच्या नैवेद्यांची करण्यात आलेली सुंदर आणि नेटकी मांडणी भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भक्तीबरोबरच प्रसादाचा आनंद मिळावा, या उद्देशाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या मिठाई, फळे तसेच पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश असलेला छप्पन भोग सजविला. विविध रंग, आकार आणि आकर्षक मांडणीमुळे हा नैवेद्य भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.

या धार्मिक उपक्रमासाठी सुरभी मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या निमित्ताने अण्णानगर परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत बाप्पाचे दर्शन घेतले. छप्पन भोगाचे विलोभनीय स्वरूप पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी झाली होती.

भाविकांनी भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाच्या या आगळ्यावेगळ्या धार्मिक उपक्रमामुळे अण्णानगर परिसरातील गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढला. संपूर्ण परिसरात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासह भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपत सामाजिक एकोपा आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्याचा सुरभी मित्र मंडळाचा हा उपक्रम नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version