जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत संजना मोरेची विभागीय स्पर्धेसाठी निवड
१४ वर्षांखालील ४६ किलो वजन गटात उल्लेखनीय कामगिरी; श्री. दत्त माध्यमिक विद्यालयाचा गौरव
पारोळा । संदीप पाटील (प्रतिनिधी) : चाळीसगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, टेहू, ता. पारोळा संचलित श्री. दत्त माध्यमिक विद्यालय, चोरवड येथील विद्यार्थिनी कु. संजना विजय मोरे हिने दमदार कामगिरी करत १४ वर्षांखालील ४६ किलो वजन गटात नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे.
संजना मोरे हिने जिल्हास्तरीय स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्री. दत्त माध्यमिक विद्यालय, चोरवड तसेच चोरवड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संजना हिच्या यशामागे विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन, क्रीडा प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि पालकांचे प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले. सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर तिने विभागीय स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे.
संजना मोरे हिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार वसंतराव मोरे, जिल्हा दूध संघाचे संचालक पराग मोरे, पारोळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष रोहन मोरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद पाटील, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी, माजी गटशिक्षणाधिकारी विश्वास हरी पाटील, तालुका समन्वयक संदीप पाटील, मार्गदर्शक प्रमोद पाटील (भोंडण), क्रीडा शिक्षक उमेश पाटील तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
यावेळी संजना मोरे हिने आगामी विभागीय कुस्ती स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून श्री. दत्त माध्यमिक विद्यालय, चोरवड, चोरवड गाव आणि पारोळा तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
