बोरगावचा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न
१२१ व्या वर्षाची परंपरा; काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन
बोरगाव खुर्द/प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील बोरगाव खुर्द व बोरगाव बु. येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने गेल्या १२१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या हरिनाम कीर्तन सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. वैकुंठवासी ह.भ.प. तुकाराम महाराज बोरगाव व वैकुंठवासी ह.भ.प. तुकाराम महाराज चाळीसगावकर यांच्या प्रेरणेतून तसेच संतांच्या आशीर्वादाने आणि ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे.
यंदाच्या सप्ताहाला भाद्रपद शु. अष्टमी, शनिवार दि. १९ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला. शनिवार दि. २६ सप्टेंबर रोजी पौर्णिमेच्या दिवशी सप्ताहाची सांगता करण्यात आली. सप्ताहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, हरिनाम संकीर्तन आणि कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक विचारांचे मार्गदर्शन मिळाले.
सांगतेच्या दिवशी ह.भ.प. देवेंद्र महाराज माळसांगवी यांचे काल्याचे कीर्तन झाले. महाराजांनी आपल्या कीर्तनातून भक्ती, नामस्मरण आणि संतपरंपरेचे महत्त्व विशद केले. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला.
काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.
या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ह.भ.प. प्रभाकर नामदेव कंखरे महाराज तसेच बोरगाव खुर्द व बोरगाव बु. येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामस्थ आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे १२१ वर्षांची ही धार्मिक परंपरा यंदाही उत्साहात पार पडली.
