Spread the love

चोपडा एसटी आगारात पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल

आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांमध्ये समाधान

चोपडा प्रतिनिधी – राहुल पाटील :  चोपडा एसटी आगारातील बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार चोपडा एसटी आगारात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, त्यांचा लोकार्पण सोहळा आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे आणि माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पार पडला.

या नव्या बसेस अद्ययावत सुविधांनी सज्ज असून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्याने चोपडा आगाराच्या बससेवेत वाढ झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी चोपडा आगारासाठी ३० बसेस मंजूर करण्यात आल्या होत्या. याशिवाय चालू वर्षात आगारात २० एसी, १० डिझेल आणि ५ राजमाता जिजाऊ, अशा एकूण ३५ नवीन बसेस दाखल झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नियमित प्रवाशांना अधिक बसफेऱ्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील दळणवळण, विद्यार्थ्यांचा प्रवास तसेच शेतकरी आणि कामगार वर्गासाठी एसटी सेवा महत्त्वाची असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आणखी ५,००० नवीन ‘लालपरी’ बसेस दाखल करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सप्टेंबरमध्ये दिली आहे. या नव्या बसेसमुळे एसटीचा ताफा वाढवून प्रवाशांच्या मागणीनुसार बसफेऱ्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी परिवहन विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करत चोपडा आगारासाठी आणखी सुविधा व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे सांगितले. तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आगाराच्या विकासासाठी पाठपुरावा करण्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास तहसीलदार भाऊसाहेब थोरात, लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. स्मिताताई पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, सुरेश बापू पाटील, मंगलताई पाटील, शिवराज पाटील, किरण देवराज, प्रताप अण्णा पाटील, प्रकाश रजाळे, नगरसेवक दीपक पाटील, हनिफ सत्तार, अमोल पाटील, नगरसेविका दीपाली चव्हाण, रुकसारबी बागवान, सविता पाटील, स्वाती बडगुजर, शीतल देवराज, माजी नगरसेवक महेंद्र धनगर, विकास पाटील, प्रकाश राजपूत, युवराज अलकरी, दीपक चौधरी, पुंडलिक महाजन, सुनील बरडिया, प्रदीप बारी, गोपाल चौधरी, नामदेव आप्पा पाटील, मंगल इंगळे, निलेश पाटील चहार्डी, दशरथ बाविस्कर, शाम पाटील, राजेंद्र पाटील, मुन्ना ठाकूर, गोविंदा कोळी, प्रताप पाटील, एस. आर. पाटील, राहुल पाटील लासूर, देविदास पाटील, अशोक बापू, बापू पाटील, मच्छू कोळी, नंदू गवळी, दिव्यांक सावंत, विशाल पाटील, लोकेश पाटील, अकील जहागिरदार, फरमान मिस्त्री, संदीप पाटील, किरण चौधरी, गणेश पाटील, राहुल पाटील यांच्यासह विभाग नियंत्रक यज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक संदेश क्षिरसागर, यांत्रिकी उपअभियंता किशोर पाटील, चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, आगारातील अधिकारी-कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version