सेवा संकल्प अभियानांतर्गत म्हसावद येथे तालुकास्तरीय शिबिर
एकाच छताखाली २०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध दाखले व योजनांचा लाभ; “भटक्या-विमुक्तांची शासकीय कामांसाठीची धावपळ कमी होणार” — प्रतापराव पाटील
म्हसावद/पाळधी/जळगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : सातत्याने स्थलांतर करणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ उपयुक्त ठरत आहे. एकाच छताखाली आवश्यक दाखले तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्याने लाभार्थ्यांचा वेळ, श्रम आणि कार्यालयीन धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २०० हून अधिक लाभार्थ्यांना जन्म-मृत्यू दाखले, आयुष्मान कार्ड, जात प्रमाणपत्रे, शिधापत्रिका तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.
यावेळी प्रतापराव पाटील यांनी पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळण्यासाठी पुरवठा विभागाने इष्टांक वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी योगेश कुमार मीना होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रांताधिकारी योगेश मीना, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
विविध विभागांचा सहभाग
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक विशाल राठोड यांनी प्रास्ताविकातून सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय शिबिराची माहिती दिली. विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला.
नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनी सूत्रसंचालन केले, तर तहसीलदार शितल राजपूत यांनी आभार मानले.
अधिकारी, पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तहसीलदार शितल राजपूत, नायब तहसीलदार प्राजक्ता केदार, मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, श्रीकांत माटे, स्नेहा साखरे, अशासकीय सदस्य प्रविण सूर्यवंशी, फकीरा भोई, अमर काटोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविले जात असून, शासकीय सेवा व लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत.
