Spread the love

एरंडोलमध्ये ११ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ३७ ग्रामपंचायतींचा कारभार!

एकाच प्रशासकाकडे तीन-तीन ग्रामपंचायती; मूळ पदाची जबाबदारी सांभाळून गावांचा कारभार पाहण्याची कसरत

एरंडोल : तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी तब्बल ११ अधिकाऱ्यांच्या खांद्यावर दोन ते तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आल्याने ग्रामपंचायतींचा प्रत्यक्ष कारभार कितपत प्रभावीपणे चालेल, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना आपापल्या मूळ शासकीय पदाची जबाबदारी सांभाळूनच अतिरिक्त ग्रामपंचायतींचा कारभार पाहावा लागणार आहे.

जिल्हा परिषद, जळगाव यांच्या ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, केंद्रप्रमुख तसेच अन्य शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशात काही अधिकाऱ्यांकडे तब्बल तीन ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार, ग्रामसभा, विकासकामांची पाहणी, कर वसुली, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यासाठी प्रशासकांची उपलब्धता महत्त्वाची असते. मात्र एकाच वेळी मूळ कार्यालयीन जबाबदारी आणि दोन-तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कारभार सांभाळताना अधिकाऱ्यांची मोठी कसरत होणार असल्याची चर्चा आहे.

एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर तीन-तीन गावांचा गाडा!

आदेशानुसार तब्बल नऊ अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • दीपक अत्तरदे — कढोली, वैजनाथ, टाकरखेडे

  • जे. डी. पाटील — पिंपळकोठा खुर्द, पिंपळकोठा बुद्रुक, रिंगणगाव

  • विलास सांळुखे — खर्ची खुर्द, खर्ची बुद्रुक, उमरदे

  • संजय शिंदे — गालापूर, भातखेडा, उत्राण अ.ह.

  • बी. के. पारधी — कासोदा, उत्राण गृह, पातरखेडे

  • एस. टी. मोरे — तळई, ब्राह्मणे, ताडे

  • आर. के. पटाईत — जावखेडे बुद्रुक, जावखेडे खुर्द, पिंपरी प्र.चा.

  • चेतन पाटील — खडके खुर्द, हणमंतखेडे बुद्रुक, सोनबर्डी

  • धनश्री जडे — फारकांडे, धारागीर, जळू

या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ पदाची जबाबदारी सांभाळतानाच संबंधित तीन ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार पाहावा लागणार आहे.

दोन अधिकाऱ्यांकडे दोन-दोन ग्रामपंचायती

याशिवाय राकेश रतीलाल माळी यांच्याकडे पिंपरी बुद्रुक व हणमंतखेडे सिम, तर ज्ञानेश्वर के. अधाणे यांच्याकडे निपाणे व खडके सिम या दोन ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सरपंचांचे अधिकार प्रशासकांकडे

प्रशासकांना संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंचांचे अधिकार व कर्तव्ये सोपविण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीचे हिशोब व कामकाज ग्रामपंचायत अधिनियम तसेच लेखासंहिता २०११ नुसार चालविणे, प्रलंबित लेखापरीक्षण पूर्ण करणे, आवश्यक असल्यास करांची फेरआकारणी करणे आणि कर वसुली किमान ७० टक्क्यांपर्यंत राहण्यासाठी उपाययोजना करणे, अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत.

याशिवाय शासनाच्या योजनांची नियमानुसार अंमलबजावणी करणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि ग्रामपंचायतीकडून होणारी वसुली प्रथम बँकेत जमा करणे, अशी आर्थिक व प्रशासकीय शिस्तही राखावी लागणार आहे.

नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर संबंधित प्रशासकांचे अधिकार तत्काळ संपुष्टात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामस्थांचा सवाल : “तीन गावांना वेळ कसा देणार?”

ग्रामपंचायतीचा कारभार हा केवळ कागदोपत्री नसून प्रत्यक्ष गावपातळीवर चालतो. ग्रामसभा घेणे, विकासकामांची पाहणी करणे, पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या समस्या सोडविणे, कर वसुलीचा आढावा घेणे, नागरिकांच्या तक्रारी ऐकणे तसेच विविध शासकीय योजनांचा पाठपुरावा करणे यासाठी प्रशासकांची नियमित उपलब्धता आवश्यक असते.

मात्र विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, केंद्रप्रमुख अशा मूळ पदांवरील जबाबदाऱ्या सांभाळत एकाच अधिकाऱ्याला दोन-तीन ग्रामपंचायतींचा कारभार पाहावा लागणार असल्याने संबंधित अधिकारी प्रत्येक गावाला पुरेसा वेळ देऊ शकतील का? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

एकाच अधिकाऱ्यावर अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्याऐवजी गावांच्या भौगोलिक अंतराचा, कामाच्या व्यापाचा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून प्रशासकीय नियोजन होणे आवश्यक असल्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version