मोंढाळे येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांचा संवाद
शेतशिवाराची प्रत्यक्ष पाहणी; पिकांची स्थिती, नुकसान व शेतकऱ्यांच्या अडचणींची घेतली माहिती
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) :
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोंढाळे प्र.अ. येथील शेतशिवाराची पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि विविध अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार ॲड. अमोल पाटील यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा मांडत मोंढाळे प्र.अ. येथे प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची विनंती केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नार्वेकर आणि गिरीश महाजन यांनी मोंढाळे येथे भेट देत शेतशिवाराची पाहणी केली.
पिकांची स्थिती जाणून घेतली
पाहणीदरम्यान शेतातील पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड, पाण्याची उपलब्धता आणि झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडत दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून आवश्यक मदत आणि सवलती मिळण्याची मागणी केली.
राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून Trigger-1 अंतर्गत जमीन महसूल सवलत, पीक कर्ज पुनर्रचना, कृषी कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलाबाबत सवलती, रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य तसेच आवश्यक ठिकाणी पाणी व चारा व्यवस्थेसह विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. पीक नुकसानीची प्रत्यक्ष मदत मात्र निर्धारित पाहणी व पंचनाम्याच्या प्रक्रियेनंतर स्वतंत्रपणे निश्चित होणार आहे.
शेतकऱ्यांना मदतीची मागणी
दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदतीचा लाभ तातडीने मिळावा, तसेच पीक नुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार मदत मिळावी, अशी मागणी आमदार ॲड. अमोल पाटील यांनी यावेळी केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि पंचनाम्यांवर भर दिला आहे.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंदआबा शिरोळे, पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीषभाऊ पाटील, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, भाजपा तालुकाध्यक्ष अतुलअण्णा पवार, गिरडचे माजी सरपंच संजय पाटील, पिंपळगावचे सरपंच जयराम पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
