Spread the love

लासूर येथे २८ सप्टेंबरपासून संगीतमय शिव महापुराण कथा

पातळेश्वर महादेव मंदिरात सात दिवसांचा धार्मिक ज्ञानयज्ञ; ५ ऑक्टोबरला काल्याचे कीर्तन व महाप्रसाद

चोपडा (विशेष प्रतिनिधी) : राहुल पाटील

लासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील इंदिरानगर परिसरातील पातळेश्वर महादेव मंदिर येथे संगीतमय शिव महापुराण कथा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ पासून या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ होणार असून रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी शिव महापुराण कथेची सांगता होणार आहे.

या कालावधीत दररोज रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. संतकृपा वारकरी शिक्षण संस्था, कांचनपूरचे अध्यक्ष ह.भ.प. दिनेशजी महाराज कांचनपूरकर हे कथाकार म्हणून उपस्थित राहून शिव महापुराणातील विविध प्रसंगांचे निरूपण करणार आहेत. त्यांच्या रसाळ वाणीतून भाविकांना शिवमहापुराणातील आध्यात्मिक आणि धार्मिक विचारांचे श्रवण करता येणार आहे.

५ ऑक्टोबरला काल्याचे कीर्तन व महाप्रसाद

शिव महापुराण कथा सांगतेनंतर सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत ह.भ.प. दिनेशजी महाराज कांचनपूरकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सात दिवस मास-मच्छी विक्री बंद; गावाच्या एकोप्याची चर्चा

शिव महापुराणाच्या निमित्ताने लासूर गावात सात दिवस मास-मच्छी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतलेला हा निर्णय गावातील सामाजिक सहभाग आणि परस्पर सहकार्याचे उदाहरण म्हणून चर्चेत आहे. या काळात विविध समाजघटकांकडून कार्यक्रमाला सहकार्य मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

समितीचे नियोजन; ग्रामस्थांचे सहकार्य

शिव महापुराण कथा समितीचे अध्यक्ष समाधान कोळी (आबा), उपाध्यक्ष रावसाहेब सोनगिरे, सचिव सुरेश महाजन, सहसचिव नंदू भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

समितीचे सदस्य भालचंद्र पाटील, देविदास माळी, विनोद माळी, भगवान माळी, योगराज माळी, सुरेश पाटील, रवींद्र कोळी, राहुल कोळी, पप्पू पाटील, महेंद्र माळी, राहुल माळी, पिंटू माळी, सचिन माळी, मनोहर धोबी यांच्यासह पातळेश्वर महादेव मंदिर समिती आणि समस्त ग्रामस्थ लासूर यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभत आहे.

या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिव महापुराण कथेचे श्रवण, काल्याच्या कीर्तनाचा लाभ आणि महाप्रसादाचा प्रसाद घ्यावा, असे आवाहन शिव महापुराण कथा समिती, इंदिरानगर, लासूर आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version