धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये माहिती अधिकार दिनानिमित्त विशेष व्याख्यान
माहिती अधिकार हा सामान्य नागरिकाच्या हातातील लोकशाहीचा प्रभावी आधार : डॉ. बापू शिरसाठ
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या वर्धापन दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक तथा बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. बापू शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व आणि त्यामागील लोकशाही मूल्यांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील होते. पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी तसेच शिक्षक नंदू पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बापू शिरसाठ म्हणाले, “माहितीचा अधिकार हा केवळ कायद्याच्या पुस्तकातील कायदा नसून सामान्य नागरिकाच्या हातातील लोकशाहीचे प्रभावी साधन आहे. या कायद्यामुळे नागरिकांना शासन आणि प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे.”
प्रश्न विचारण्याची वृत्ती ही लोकशाही व्यवस्थेतील जागरूक नागरिकत्वाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात जबाबदार आणि सजग नागरिक म्हणून घडण्याचे आवाहन केले. “प्रश्न विचारणारा विद्यार्थी पुढे जागृत नागरिक बनतो,” असे त्यांनी अधोरेखित केले.
माहिती अधिकाराचा जनहितासाठी वापर करावा
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व अधोरेखित करताना कायद्याचा वापर जबाबदारीने आणि जनहितासाठी करण्याचे आवाहन केले. कायद्याचा गैरवापर होऊ नये, याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. सी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय बेलदार यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
