Spread the love

अक्राणी तालुक्यातील ७ ‘कोतवाल’ पदांसाठी उद्या आरक्षण सोडत!

तहसील कार्यालयात दुपारी २ वाजता चिठ्ठ्या टाकून प्रक्रिया; सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

धडगाव प्रतिनिधी :
अक्राणी तालुक्यातील विविध महसूल सजेअंतर्गत रिक्त असलेल्या महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, सात रिक्त पदांसाठी समांतर अर्थात महिला आरक्षण निश्चित करण्याकरिता बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. चिठ्ठ्या टाकून पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती शहादा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दिपक पदमसिंग गिरासे यांनी जाहीरनाम्याद्वारे दिली आहे.

नाशिक विभागाच्या सहाय्यक आयुक्त (मावक) यांच्याकडून अक्राणी तालुक्यातील कोतवाल संवर्गाची बिंदू नामावली मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा अंतर्गत) रिक्त असलेली एकूण ७ पदे १०० टक्के सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार या सात पदांपैकी पाच पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आणि दोन पदे महिलांसाठी (३० टक्के आरक्षण) निश्चित करावयाची आहेत. मात्र, हे महिला आरक्षण कोणत्या महसूल सजेतील पदांसाठी राहणार, हे सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे.

तहसील कार्यालयात होणार सोडत

ही आरक्षण सोडत बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता तहसील कार्यालय सभागृह, अक्राणी (धडगाव) येथे आयोजित करण्यात आली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या सात महसूल सजेचा समावेश

१. बोरवण सजा : बोरवण, खरवड, चाँदवाडे बु., चोंदवाडे खु., अंबारी, बिलबारपाडा.

२. तोरणमाळ सजा : जुने तोरणमाळ, नवे तोरणमाळ, केलापाणी, झापी, कुंड्या, भादल, उडद्या.

३. गोरंबा सजा : गोरंबा, वेलखेडी, जुगणी, मोडलगाव.

४. खुंटामोडी सजा : खुंटामोडी, कुंडल, खांडबारा, मोजरा, कात्री रे., कात्री फॉ., माकडकुंड, पौला.

५. रोषमाळ बु. सजा : रोषमाळ बु., वडफळ्या, जुने धडगाव, हरणखुरी, भुजगाव.

६. खर्डा सजा : खर्डा, हातधुई, वरखेडी बु., वरखेडी खु., टेंबला.

७. दुट्टल सजा : दुट्टल, चिंचखेडी, नळगव्हाण, बोरसिसा, निमगव्हाण, सुरुंग.

गावपातळीवर प्रसिद्धीचे निर्देश

आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी संबंधित गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दिपक पदमसिंग गिरासे यांनी केले आहे.

सोडतीची माहिती गावपातळीवर नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दवंडी देणे तसेच ग्रामपंचायत आणि चावडीच्या सूचना फलकावर प्रसिद्धी करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी, संबंधित मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत.

अक्राणी तालुक्यातील या सात महसूल सजेतील कोतवाल पदांच्या भरतीपूर्वी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे संबंधित गावांचे आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version