द्वारका नगर मित्र मंडळाचा ‘पावनखिंड’चा थरारक ऐतिहासिक देखावा
छत्रपती शिवाजी महाराज व बाजीप्रभूंच्या शौर्याची गाथा जिवंत; पंचक्रोशीत नागरिकांचे आकर्षण
नशिराबाद प्रतिनिधी :
शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा प्रेरणादायी इतिहास सांगणाऱ्या ‘पावनखिंड’च्या थरारक ऐतिहासिक प्रसंगाची आकर्षक प्रतिकृती नशिराबाद येथील द्वारका नगर मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आली आहे. द्वारका नगर, अण्णा नगर परिसरात उभारण्यात आलेला हा देखावा सध्या पंचक्रोशीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, नागरिकांकडून मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
शौर्यगाथेतून तरुणांना इतिहासाची प्रेरणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यरक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैन्याने पावनखिंडीत दिलेल्या लढ्याची शौर्यगाथा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय मानली जाते. याच इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी, शौर्य व त्यागाची प्रेरणा मिळावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा तरुणांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने मंडळाने यंदा पावनखिंडीचा देखावा साकारला आहे.
देखाव्यामध्ये ऐतिहासिक प्रसंगाचे विविध पैलू प्रभावीपणे मांडण्यात आल्याने तो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. विशेषतः तरुणाईकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
हा देखावा साकारण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष हेमंत दगडू तळेले, उपाध्यक्ष राहुल ज्ञानदेव चौधरी, खजिनदार दीपक जगदीश जाधव आणि सचिव ललित रवींद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. देखाव्याची संकल्पना आणि उभारणीमध्ये मंडळातील सर्व सदस्यांनी सामूहिक सहभाग नोंदविला.
तरुण कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम
ऐतिहासिक देखावा प्रत्यक्षात साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. यामध्ये ललित रवींद्र महाजन, कल्पेश प्रमोद पाटील, हिमांशू चौधरी, दीपक जगदीश जाधव, कमलेश पोपट नेहते, संजय नथ्थू नेहते, मनोज सुभाष पाटील, अक्षय कैलास महाजन, मोहित माळी, मयूर माळी, वेदांत पाटील, संदीप भागवत भोगे, परेश माळी यांच्यासह इतर तरुण कार्यकर्त्यांचे योगदान राहिले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक वातावरणासोबतच इतिहास, शौर्य आणि संस्कारांची ओळख करून देणारा देखावा उभारल्याने द्वारका नगर मित्र मंडळाच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. पावनखिंडीचा इतिहास जाणून घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने देखाव्याला भेट देत आहेत.
