दुष्काळी मदतीसाठी चांदूर बिस्वा येथे शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
हेक्टरी एक लाख रुपये मदतीसह प्रलंबित पीक विमा तातडीने देण्याची मागणी; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
मलकापूर प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चांदूर बिस्वा येथील मंडळ अधिकारी यांच्या दालनात सुमारे एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांना दुष्काळी मदत म्हणून हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे, मागील वर्षीचा तसेच चालू वर्षीचा प्रलंबित पीक विमा तातडीने अदा करण्यात यावा आणि ई-पिक पाहणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विलंब न करता आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे तसेच अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार मरकंड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. मात्र, मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
