घरकुल योजनेचे प्रलंबित उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा!
पारोळ्यात ‘ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन’चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निकाली काढण्याची मागणी
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : तालुक्यातील पात्र व गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योजनेचे प्रलंबित उद्दिष्ट तातडीने मागवून मंजूर करण्यात यावे, अशी मागणी ‘ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन’ संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, पारोळा तालुक्यात विविध घरकुल योजनांसाठी पात्र असलेल्या अनेक गरजू कुटुंबांना अद्याप पक्क्या घरांचा लाभ मिळालेला नाही. सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत घरकुलांचे निश्चित उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन असतानाही काही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे उर्वरित उद्दिष्ट शासन स्तरावरून तातडीने मागवून घेऊन पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्याची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी करण्यात आली.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
-
घरकुल योजनेचे उर्वरित उद्दिष्ट शासन स्तरावरून तातडीने मागविण्यात यावे.
-
पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत.
-
गावनिहाय पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून घरकुल मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी.
-
मंजूर लाभार्थ्यांना नियमानुसार अनुदानाचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा.
-
घरकुल योजनेचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात.
तालुक्यातील गरजू व पात्र लाभार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रलंबित घरकुल प्रस्तावांची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कमलेश सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष राहुल सरदार, तालुका शहराध्यक्ष सागर माळी, जिल्हा सचिव भैय्या पाटील, तालुका आरोग्य प्रमुख जाकीर पिंजारी, उत्तर महाराष्ट्र सचिव चंद्रकांत सोनवणे, तालुका सचिव श्रीकांतराव सोनवणे यांच्यासह जितेंद्र पाटील, लाला पाटील, रविंद्र पाटील, महेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
