Spread the love

शासकीय आश्रमशाळा गमन येथे विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

आरोग्य पथकाकडून विद्यार्थ्यांची सर्वांगीण तपासणी; गरजू विद्यार्थ्यांना उपचार व पुढील वैद्यकीय संदर्भ सेवा

धडगाव प्रतिनिधी : अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जांगठी अंतर्गत येणाऱ्या गमन उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, गमन (सध्या भगदरी) येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शाळेतील मुला-मुलींची सखोल शारीरिक व आरोग्य तपासणी करण्यात आली.

आरोग्य तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची सामान्य आरोग्य तपासणी, उंची-वजन, हिमोग्लोबिन, ॲनिमिया, डोळे, दात तसेच आवश्यक इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तपासणीमध्ये आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय पथकाकडून आवश्यक उपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

ज्या विद्यार्थ्यांना पुढील उपचार किंवा अधिक तपासणीची आवश्यकता आहे, अशा विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय सेवेसाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वेळेत ओळखून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यास मदत झाली.

वैद्यकीय पथकाचे विशेष परिश्रम

आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. दाजला वसावे, डॉ. संदीप पाडवी, आरोग्य सहाय्यक ज्ञानदेव वीर, ए.एन.एम. गीता वसावे, एम.पी.डब्ल्यू. योगेश डी. पाडवी आणि दिलीप राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिराच्या आयोजनासाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंदाने मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी व वेळेवर उपचार मिळण्यासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version